बँकेचे कर्ज न फेडल्याने पाचोरा कृउबाला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:58 PM2019-02-07T23:58:51+5:302019-02-07T23:59:06+5:30
पाचोरा : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामासाठी जळगाव पीपल्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड १० वर्षे होऊनही न झाल्याने ...
पाचोरा : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामासाठी जळगाव पीपल्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड १० वर्षे होऊनही न झाल्याने ७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या सात खोल्या बँकेने सील केल्या. मात्र नंतर चार खोल्यांचे सील काढल्याने सभापतींच्या दालनासह इतर खोल्यांचे सील कायम आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने २००८मध्ये साडेचार कोटीचे कर्ज घेऊन बांधकामे केली. मात्र बाजार समितीने कर्जफेड न केल्याने बाजार समितीकडे बँकेचे ५ कोटी ४ लाख थकबाकी आहे. त्यामुळे गुुरुवार ७ फेब्रुवारी रोजी जळगाव पीपल्स बँकेने तारण घेतलेली मालमत्ता जप्त करून सील केली.
स्थगिती असताना कारवाई
दरम्यान कर्जापोटी बाजार समितीच्या जागेचा लिलाव बँकेने करण्याचे ठरविले, मात्र त्यास सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे हरकती दाखल केल्या. त्यामुळे जागा विक्रीस स्थगिती दिली आहे. जागा विक्रीस स्थगिती असताना बँकेने बाजार समितीस मालमत्ता जप्तीची नोटीस न देता गुुरुवारी अचानक बँकेच्या ८ वसुली अधिकाऱ्यांनी बाजार समितीचे कामकाज सुरू असताना बाजार समितीच्या कार्यालयातील ७ खोल्यांना सील ठोकले. मुख्य प्रवेश द्वारासदेखील कुलूप लावले. मात्र पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी घटनास्थळी धाव घेत भविष्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकºयांचा प्रश्न याविषयी संबंंधितांना समज देत मध्यस्थी केली. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजासाठी ४ खोल्यांचे सील काढून पुन्हा सचिवांच्या ताब्यात देण्यात आले. सभापती व सचिवांचे कॅबिन, सभागृह या तीन खोल्या सील करण्यात आल्या आहेत.
या वेळी बँकेच्या अधिकाºयांनी कृउबाचे सचिव बी. बी. बोरूडे यांच्याशी अरेरावी करीत कर्मचाºयांना बाहेर काढले, असा आरोप करण्यात आला.
प्रथमच नामुष्की
४ तास कारवाई होत असतानाही जबाबदार पदाधिकारी तेथे चर्चेला का आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बँकेची ही कारवाई नाटक तर नाही ना ? अशी शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात चर्चा सुरू होती. शेतकºयांची संस्था कर्जाच्या खाईत लोटल्याने कर्ज घेणाºया तत्कालीन संस्था चालकांच्या गैरव्यवहाराची उपस्थितांत चर्चा सुरू होती. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ही नामुष्की ओढवल्याने दहा वर्षातील संस्थाचालकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
बँकेने बेकायदेशीर जप्ती करून नियमांचे उल्लंघन केले आहे. बँकेने यापूर्वीच बाजार समितीचा भूखंड विक्रीस काढला असताना इतर मालमत्तेवर कब्जा घेण्याचे कारण नाही. मागील सत्ताधाºयांनी ८ कोटीच्या कर्जासाठी ८० कोटीची मालमत्ता तारण देणें हेच चुकीचे झाले.
- सतीश शिंदे, सभापती पाचोरा कृउबा
बँकेची अशाप्रकारे कारवाई करणे बेकायदेशीर असून सदरील बाब न्यायप्रविष्ट असल्याने बँकेने न्यायालयाचा अवमान केला आहे. याविषयी शेतकºयांसह बँकेविरुद्ध कोर्टात जावे लागेल.
- अॅड. विश्वासराव भोसले, उपसभापती बाजार समिती
बाजार समितीकडे वारंवार कर्जफेड बाबत मागणी करूनही परतफेड करीत नसल्याने नियमाप्रमाणे कारवाई करणे भाग पडल. शेतकरी हितासाठी व कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चर्चेअंती काही खोल्यांचे सील तोडून सचिवांकडे कामकाजासाठी ताब्यात दिले. बँक पूर्ण पैसा वसूल करेल.
- राजेंद्र सोनार बँक अधिकारी, जळगाव पीपल्स बँक
बँकेने जप्तीबाबत कोणतीही सूचना न देता केलेली कारवाई चुकीची असून बँकेच्या अधिकाºयांनी अरेरावी करीत आमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणला.
- बी. बी. बोरूडे, सचिव, बाजार समिती