पाचोरा येथून आठवीचा विद्यार्थी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:34 PM2019-02-11T21:34:43+5:302019-02-11T21:36:39+5:30
चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे.
पाचोरा : तालुक्यातील चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे.
याबाबत मुलाचे वडील उखर्डू अब्दुल तडवी रा.चिंचपुरे, ता.पाचोरा यांनी सांगितले की, अन्वर उखर्डू तडवी हा पाचोरा येथील त्र्यंबक नगरातील एका वसतिगृहात राहून तुळजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात आठवीत शिक्षण घेतो.
१ फेब्रुवारी रोजी अन्वर हा चिंचपुरे येथे सुट्टी असल्याने घरी आलेला होता. ४ रोजी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे त्यास भोजे गावाहून पाचोरा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले.
मुलगा अन्वर नेहमीप्रमाणे पाचोरा येथे वसतिगृहात गेला असल्याचे समजून अन्वरचे वडील उखर्डू तडवी हे ११ रोजी पाचोरा येथे मुलास वसतिगृहात भेटण्यासाठी गेले. तेव्हा वसतिगृह अधीक्षक अनिल सावंत यांनी सांगितले की, ‘अन्वर ८ दिवस झाले. घरी गेल्यापासून परत आलाच नाही.’ तेव्हा अन्वरचे वडील भांबावून गेले. त्यांनी तत्काळ सर्व नातेवाईकांशी संपर्क केला असता अन्वर कुठेही आढळत नसल्याचे लक्षात आले.
या घटनेची खबर देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे गाठले. तेव्हा ही घटना पाचोरा येथे घडल्याने पाचोरा पोलीस स्टेशनला नोंदवा, असे मुलाच्या वडिलास पोलिसांनी संगितले.
भांबावलेले पालक उखडू तडवी पाचोरा पोलीस ठाण्यात आले. मुलगा भोजे गावाहून बसमध्ये बसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने तेथेच दाखल करावे म्हणून पाचोरा पोलिसांनी त्यास हुसकावून दिले. दरम्यान, मुलगा आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पालकांना आज कळाले. विद्यार्थी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
४ रोजी सोमवती अमावस्य होती, त्या मुलाचे अपहरण तर झाले नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचदिवशी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील विद्यार्थ्याचा निर्घृण खून झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुलाची उंची ३.५ फूट असून, रंग गहुवर्णी, सडपातळ बांधा आहे.