पोपटा, पोपटा, बोलतोस गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:12 AM2019-06-12T00:12:44+5:302019-06-12T00:14:29+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित लिहिताहेत साहित्यिक माया दिलीप धुप्पड...
घारीची आकाशातली, पंख पसरून संथ गतीची भरारी मनाची सखोलता वाढवते़ समुद्रावरून उडणारे पक्षी पाहिले की असं वाटतं विशाल समुद्र पार करेपर्यंत त्यांच्या पंखात बळ आणि मनात आत्मविश्वास कोण देतं? किती शिकावं या पक्ष्यांकडून? बगळ्यांची आकाशातली समूह कवायत आणि हजारो लहान काळ्या पक्ष्यांची आकाशातील संघ कवायत, करामती पाहून आनंद तर होतोच पण यांना मिल्ट्रीची शिस्त कुणी शिकवली, असा प्रश्न मनात उभा राहतो़ इथ इथ बस रे मोरापासून बालपण सुरू होतं़ त्या गाण्यातला आणि पुस्तकातला सुंदर मोरापासून बालपण सुरू होतं़ त्या गाण्यातला आणि पुस्तकातला सुंदर मोर व्हॉटस्अॅपवर येऊन त्यांच्या नजाकती दाखवतो़ ते पहायलाही आवडतं मग नांदेड हे पोपटांचा हिरवा रंग ल्यालेलं हिरवं शहर आणि स्टेशनवर हिरव्या झाडांवर मला हिरव्या हज्जारो पोपटांचं झालेलं दर्शऩ ते क्षण मनाच्या भूमीवर हज्जारो घरे करून राहिले आहेत़ हज्जारो घरे? हो, हज्जारो घरे, कारण मनाच्या जागेला प्लॉटचे भाव नसतात़
बालकवितांमध्ये पोपटाची चोच बोलत असते़ मिट्ठू मिठ्ठू पोपट, बोलतोस गोड, देवू का तुला पेरुची फोड?
मंगेश पाडगावकर एका कवितेत म्हणतात,
एक होता पोपट
तो आईला म्हणाला,
तू मला थोपट
या पोपटांना तर अंगाई गाऊन थोपटवायला कुणी नव्हतं, पण हे पोपट मात्र माझ्या मनात अंगाई गीतापासून सर्व गाणी गात होते़
आम्ही झाडांकडे पाहतोय़ फोटो काढतोय म्हणून आजूबाजुची माणसेही झाडांकडे पाहू लागली़ त्या अगोदरही कुणी पाहिलं असेलच, पण आयुष्याच्या कोलाहलात सगळ्यांचं लक्ष निसर्गाकडे नाही जात़ स्वत:च्या तंद्रीत, सुख-दु:खात व्यथा-वेदनेत आणि घाईगडबडीत असणारा माणूस ‘निसर्ग’ जवळ येवूनही त्याचा आनंद घेऊ शकत नाही़
पण शांता शेळके मात्र जगाचा ताप विसरायला आंब्याच्या झाडाच्या घनदाट छायेखाली जातात़
त्याची सावली त्यांना ‘प्रेमळ’ वाटते़ ‘इथे’ या कवितेत त्या म्हणतात़,
शांतविले मी तप्त जीवाला इथे कितीदातरी
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी
मी जळगावला आल्यावर चर्चासत्राचे आयोजक, विद्यापीठातील प्रा़डॉ़पृथ्वीराज तौर यांना फोन केला होता़ ‘सर, नांदेडमध्ये गावात कुठे पोपट जास्त संख्येने दिसतात का?’ सर म्हणाले, ‘नाही, गावात नाही़ पण रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर एकजवळ भरपूर झाडे आहेत़ त्या झाडांवर संध्याकाळपासून शेकडो बगळे येऊन बसतात़ ते झाडाच्या आत नाही तर झाडांवर जणू शेंड्यांवर बसतात़ ही हिरवी झाडे पांढरी होतात़’
वा किती छान, निसर्गाचा हा लोभसवाणा अविष्कार आणि त्यात सामील होणं ही माणसाची नैसर्गिक ओढ अजूनही टिकून आहे हेच खरं,
एका इंद्रधनुष्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं़़़ अशी अनेक इंद्रधनुष्ये आकाशात एकदम दिसली तर किती आनंद होईल? ते असंख्य पोपट पाहून मला तितकाच आनंद झाला़ मन पुढे पाय टाकायला तयार होईना़ पण सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यास्त कितीही रम्य असले तरी तिथे किती वेळ थांबणार? मनाला मागे ठेवून पाय स्टेशनचा जीना चढू लागले़ त्या मनात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता़
लहानपणी सुतारपक्षी दिसला की तो उडू नये म्हणून लांबून आम्ही खूप वेळ त्यांच्याकडे, त्याच्या लाकूड फोडणाºया चोचीकडे, डौलदार तुºयाकडे पाहात राहायचो़ आता तर फार क्वचित दिसतो सुतारपक्षी़ आशावाद रुजवणारी त्याची कविता इयत्ता सहावीला मी शिकवली आहे़ कवी वसंत सावंत यांची ‘सुतार पक्षी’ की कविता सुन्न आणि खिन्न झालेल्या मनाला हिरव्या पालवीने पालवून जाते़
दूर सागाच्या झाडाला ढोल करीत सुतार
त्याची जिद्द ताकद गेली सांगून अपार
पक्षी उडताना त्याचा नखरा न्यारा असतो़ त्याच्या तºहा विलोभनीय असतात़ तो नजारा आपल्या नजरेला सुरेल दिशा देतो़ शाळेमध्ये परस बागेतली झाडं वर्गातून दिसायची़ चिमण्या, साळुंक्या, कबुतर इ़सोबत एखादे वेळेस सारस पक्षी दिसायचा़ वर्गातल्या सगळ्या मुलामुलींना मी तो उडेपर्यंत पहायला लावायची़ उडताना तो आणि त्यांच्या अदा कमालीच्या सुंदर असायच्या़ वर्गातून ओ, वा, किती छानचे सूर भिंतीना जागं करायचे़ एका भिंतीवर चिऊताईचं घरटं होतं़ चिऊताईची चिवचिव ताल धरायची़
पक्ष्यांचं नाजुकसं उडणं मनाला संवेदनशील बनवतं़ पक्ष्यांचं भारदस्त उडणं मनावरचा ‘भार’ हलका करतं़ पक्षी नेहमी आनंदाचं वाण देतात़, लहान मुलांना म्हणूनच आवडतात़ क्षणभर बसतात, क्षणात उडतात, किलबिल करतात़ बालकवी म्हणतात,
क्षणभर येथे, क्षणभर तेथे भिंगोरी साची
अवकाशी जशी काय उडविले फिरकी जादुची
किंवा पटकन उठे, पटकन बसे उंच भराºया घेत सुटे
पक्ष्यांच्या हालचालींच्या गतिमानतेला सुंदरतेचा रंग असतो़ (उत्तरार्ध)
-माया दिलीप धुप्पड, जळगाव