‘हत्तीचा बेंडबाजा’ लहान्यांसह सर्वांमध्येच ठरतेय लोकप्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:19 PM2018-05-19T23:19:06+5:302018-05-19T23:19:06+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी कवी प्र.अ.पुराणिक यांनी लिहिलेल्या ‘हत्तीचा बेंडवाजा’ या काव्यसंग्रहाचा करून दिलेला थोडक्यात परिचय.
‘एकदा जंगलात भरली सभा, सर्वांना यायची होती मुभा, सभेचा विषय होता एकात्मता, क्षणेैक झाली आत्मियता...’, ‘हत्ती एकदा गेला, बाजात कापड घ्यायला, पैसे मात्र नव्हते, त्याच्याजवळ द्यायला, हत्तीला पाहताच दुकानदार घाबरला...’ अशा काही बालकविता ‘हत्तीचा बेंडवाजा’ या काव्यसंग्रहातून वाचकांचे लक्ष वेधून घेतात. धुळे येथील साहित्यिक प्र.अ. पुराणिक यांचा हा काव्यसंग्रह आहे. या बालगीत संग्रहातील सगळ्याच कविता नाद, लय, ठेका घेऊन जन्मल्या आहेत. यात पक्षी, प्राणी, फुले, निसर्ग बालदोस्तांच्या भेटीला येतो आणि बालवाचकांच्या गुंगवून ठेवतो. प्र.अ.पुराणिक यांचे हे पंधरावे पुस्तक आहे. यातील सुंदर चित्रे आणि मनमोहक सजावट यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. कवीला बालमनाची नस अचूक अचूक सापडली आहे. अध्यापकीय व्यवसायाला साजेशा बालगीतात रमणारा हा कवी. ‘हत्तीचा बेंडवाजा’ हा बालगीत संग्रह त्यांनी असा काही सजवला आहे की, बालमनाला आपण हा संग्रह सोडून नये, असे वाटते. डोंगरदऱ्या, पशु-पक्षी, वन्यप्राणी, जलचर, वनचर या सर्वांसह सभोवतालच्या साºया सृष्टीला जणू बोलके करून त्यांनी बालकांची मने आपल्या कल्पना विश्वात झकास रमविण्याचा, रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कल्पना सामर्थ्यावरच मूकसृष्टी जणू चैतन्यमय झाली आहे. बालसुलभ शब्दांची निवड करून सर्व बालकवितांचा चित्तवेधक शेवट हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. प्रौढांसाठी प्रौढ शब्दात कविता करणे सोपे आहे. पण बालकांसाठी करावयाच्या रचनेत त्या मर्यादा सांभाळणे अवघड आहे. मात्र कवी पुराणिक यांचा या बाबतीत हातखंडा आहे.
कवी : प्र.अ.पुराणिक, प्रकाशक : प्रसाद प्रभाकर पुराणिक, पृष्ठे : ३२, मूल्य : ४० रुपये.