जळगावात ‘मविप्र’चा ताबा घेण्यावरुन भोईटे व पाटील गट समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 08:43 PM2018-02-17T20:43:49+5:302018-02-17T20:46:45+5:30
मविप्र संस्थेच्या कार्यालयाचा दरवाजा तोडल्याने नूतन मराठा महाविद्यालयाला छावणीचे स्वरुप
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० नुसार वैध असल्याचा निर्णयाचा आधार घेवून, संस्थेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या भोईटे गटातील पदाधिकारी व नरेंद्र पाटील यांच्या गटातील पदाधिकारी शनिवारी दुपारी ४.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयात एकमेकांसमोर भिडल्याने मोठा गोंधळ झाला. त्यात संस्थेचा मुख्य कार्यालयाचा दरवाजा देखील तोडण्यात आला व कार्यालयाची तोडफोड देखील झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नूतन मराठा महाविद्यालय परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित ही संस्था महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार स्थापन करण्यात आली आहे. तसेच या संस्थेची मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० खाली नोंदणी करण्यात आली आहे. दोन्ही अधिनियमाखाली नोंदणी झालेल्या कार्यकारीणी वेगवेगळ्या आहेत. या दोन कार्यकारीणीचे अनेक वर्षांपासून वाद देखील सुरु आहेत. दरम्यान, महाराष्टÑ शासनाच्या शिक्षण विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांनी विभागीय शिक्षण संचालकांना व शिक्षणाधिकाºयांना पाठविण्यात आलेल्या पत्रकात मविप्र या संस्थेची १९५० नुसार नोंदणी झाली असून धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली असल्याचे सांगत ही संस्था वैध समजण्यात यावी असा उल्लेख केला आहे. याच पत्रकाचा आधार घेवून शनिवारी संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे आपल्या काही पदाधिकाºयांसमवेत नूतन मराठा महाविद्यालयात संस्थेचा ताबा घेण्यासाठी सायंकाळी ४.३० वाजता दाखल झाले. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे समर्थक देखील दाखल झाले. दोन गट समोरासमोर आल्याने वाद झाला.