महावीर अर्बन सोसायटीसह संचालकाच्या प्लॉटवर ताबा, जिल्हा बँकेची कारवाई : ३१ कोटीची थकबाकी
By सुनील पाटील | Published: January 23, 2024 03:58 PM2024-01-23T15:58:19+5:302024-01-23T15:58:33+5:30
बुधवारी आणखी काही संचालकांच्या मालमत्तेचा ताबा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली.
जळगाव : तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीसह संचालक तुळशीराम खंडू बारी यांच्या प्लॉटवर ताबा मिळवला. ३० ऑक्टोबर रोजी बँकेने सोसायटीवर जप्तीची कारवाई करुन नोटीस डकविली होती. बुधवारी आणखी काही संचालकांच्या मालमत्तेचा ताबा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली.
जिल्हा बँकेने सन २००२ मध्ये महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि. जळगांव यांना ८ कोटीचे कर्ज वाटप केलेले होते. आज मुद्दल व व्याज मिळून सोसायटीकडे जिल्हा बँकेचे ३१ कोटी २८ लाख रुपये घेणे आहे. कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने अनेक प्रयत्न केले. दीड वर्षाची एक रकमी परतफेड योजना (ओटीएस) सुविधा देवून सुध्दा संस्थेने कर्जाची परतफेड केलेली नाही. २०१९ मध्ये सहकार न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळवून वसुलीसाठी बँकेने जप्ती व मालमत्ता ताब्यात घेतल्या. बँकेचे विशेष वसुली अधिकारी मयुर पाटील, सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे ,मंगलसिंग सोनवणे, सुनील पवार, आर.आर.पाटील व अतुल तोंडापूकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गोलाणी मार्केट परिसरातील सोसायटीचे कार्यालय व बारी यांचे खेडी रस्त्यावरील दोन प्लॉट ताब्यात घेतले.
मालमत्तेची होणार विक्री
थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. सोसायटीचे संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला,सुरेश टाटीया, अपना राका, सुरेश बन्सीलाल जैन, महेंद्र शहा, अजित कुचेरीया यांनाही नोटीसा बजावल्या आहेत.