जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:29 PM2018-08-07T12:29:50+5:302018-08-07T12:31:08+5:30
पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
जळगाव : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड वाढत गेल्यास उत्पादनातील घटीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली होती. त्यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरण्याही पूर्ण झाल्या. मध्यंतरी ५-६ दिवस खंड पडल्याने त्या काळात शेतकºयांनी पिकांना खताचा डोसही दिला. त्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावल्याने खतही चांगले लागू पडले. मात्र त्यानंतर पिक ऐन वाढीच्या स्थितीत आलेले असताना गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे.
बहुतांश पिकांची वाढ खुंटली
पावसाने पिकांच्या ऐनवाढीच्या काळातच दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने काही शेतकºयांनी खते देणेही टाळले आहे. पिकांची वाढ खुंटली असून सोयाबिन वगळता सर्वच पिकांच्या उत्पादनात आजच्या स्थितीला किमान २० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. उडीद-मुगाचे पीक तर जेमतेम ६५-७५ दिवसांचे असते. त्याला आतापर्यंत शेंगा लागणे अपेक्षित होते. मात्र वाढ खुंटल्याने अद्याप शेंगा लागलेल्या नाहीत. वाढ खुंटल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.
कपाशी मोडणे सुरू
काही ठिकाणी तर कपाशीची वाढच चांगली झालेली नाही. असे शेतकरी कपाशी मोडून टाकत असून रब्बीसाठी शेत तयार करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. जामनेर, बोदवड, पाचोरा, मुक्ताईनगरचा वरचा भाग आदी भागात आधीच पावसाने तुरळक हजेरी लावलेली असतानाच पंधरा दिवस ताण दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हलक्या जमिनीवरील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.