पॉलिस्टर वापरामुळे कापसाच्या मागणीवर परिणामाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:26 AM2022-09-19T07:26:14+5:302022-09-19T07:26:52+5:30
अतुल गणत्रा यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमेरिकेत दुष्काळ व पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुरामुळे या दोन्ही देशांमधील कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने, भारतीय कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे कापसाचे दर खूप वाढतील अशीही शक्यता नाही. कारण कापसाचे दर वाढल्यामुळे देशातील अनेक स्पिनींग मिल उद्योजकांनी कापसाऐवजी पॉलीस्टरचा वापर वाढवला आहे. त्यामुळे देशातंर्गत मागणीत घट होईल. हे दर हमीभावापेक्षा जास्तच असले तरी ते खूप असण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी
दिली आहे.
यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची स्थिती कशी राहील, याबाबत मंथन करण्यासाठी रविवारी जैन हिल्सवरील सभागृहात ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी समारोपीय भाषणात गणत्रा बोलत होते. या कार्यक्रमात बजाज स्टिलचे ललित कलंत्री, महाराष्ट्र जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, टेक्साईल्स कमीश्नर उषा पोळ, सीसीआयचे अर्जुन दवे, खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांच्यासह देशभरातील जिनर्स, व्यापारी व काही शेतकरीदेखील उपस्थित होते.
देशात ३.६५ कोटी गाठींचे उत्पादन शक्य
भारतात एकूण ३ कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता गणत्रा यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात २० ते २५ लाख गाठींचे उत्पादन घटण्याचा अंदाजही व्यक्त केला. सरकीचीही मागणी घटली आहे.
बांगलादेशात निर्यात करताना काळजी घ्या
अमेरिकेत दुष्काळ, पाकिस्तानात महापूर यामुळे या दोन्ही देशांमधील कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढेल. मुख्य निर्यातदार देशांमध्ये बांगलादेशाचा समावेश आहे. मात्र, बांगलादेशात आर्थिक मंदी असल्याने या देशात निर्यात करताना काळजी घ्या, असे आवाहन वक्त्यांनी जिनर्स व व्यापाऱ्यांना केले.