कोरोनानंतरचा बदलता उद्योग अडचणींचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:35+5:302020-12-12T04:32:35+5:30
कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला होता. त्या काळात कच्चा माल बनवणाऱ्या कंपन्या बंद होत्या. अनेक परप्रांतीय कामगार ...
कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला होता. त्या काळात कच्चा माल बनवणाऱ्या कंपन्या बंद होत्या. अनेक परप्रांतीय कामगार परत गेले ते आलेच नाहीत. त्यासोबतच अनेक अडचणींचा डोंगर या कोरोनाच्या काळात उद्योगांसमोर होता. लॉकडाऊनच्या मर्यादा शिथिल झाल्या. कारखान्यांमध्ये पुन्हा यंत्रे धडाडू लागली आहेत, पण त्यांचा पूर्वीचा वेग मात्र अजूनही मिळालेला नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या मालाचा दर आवाक्याच्या बाहेर जात आहे. प्लॅस्टिक उद्योगाला पीव्हीसी रेझिन लागते. त्याचा दर हा दुपटीपेक्षाही जास्त झाला आहे. त्यामुळे साहजिकच या उद्योगासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या काळात शेतांमध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम केले जाते. त्यासाठी पीव्हीसी पाइप लागतात. कच्च्या मालाचा दर हा ६० रुपये प्रति किलोवरून १३० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे साहजिक पाइपचे दर वाढले. त्यासोबतच इतर दरदेखील वाढले आहे. मजूर पूर्वीप्रमाणे येत नसल्याने कमी मजुरांमध्ये काम करावे लागते. कुशल कामगार गावी परतले आहेत. ते अजून पूर्ण परत आलेले नाहीत. त्यातच काही दिवसांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे अनेक मजूर अजून परतलेलेच नाहीत.
कच्च्या मालाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच बाजारात येणाऱ्या उत्पादनांचेदेखील भाव वाढले आहेत. आता या भाववाढीमुळे अनेक ग्राहकांना ही उत्पादने विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे या उत्पादनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम हा बाजारपेठेवरदेखील झाला आहे.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मालाची ने-आण करण्यासाठी लागणारे दरदेखील वाढले आहे. कच्चा माल, उत्पादक, स्टॉकिस्ट, रिटेलर आणि अखेरीस ग्राहक या साखळीला मोठा धक्का बसला आहे. त्यात आता सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे.
अंजनीकुमार मुंदडा