कॅशलेस व्यवहाराबाबत टपाल विभाग उदासीन
By admin | Published: January 4, 2017 10:38 PM2017-01-04T22:38:05+5:302017-01-04T22:38:05+5:30
टपाल कार्यालय नागरिक आणि कर्मचाºयांचे पी.एल.आय, आर.डी. अशा इतर योजनांचे हप्ते धनादेशाद्वारे घेण्यास नकार देत आहे.
ंतळोदा : केंद्र सरकार एकीकडे कॅशलेस व्यवहारावर भर देऊन जनतेमध्ये जनजागृती करीत आहे, तर दुसरीकडे केंद्र शासनाच्याच परिक्षेत्रात येणारे टपाल कार्यालय नागरिक आणि कर्मचाºयांचे पी.एल.आय, आर.डी. अशा इतर योजनांचे हप्ते धनादेशाद्वारे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे नागरिकांना हप्ते भरण्यास मोठ्या प्रमाणात अडचणीना तोंड द्यावे लागत आहे़ त्यामुळे शासनाने टपाल विभागाच्या मनमानी कारभाराला आवर घलून सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
विविध विभागांच्या शासकीय कर्मचाºयांबरोबरच नागरिकांनी टपाल कार्यालयाकडून आर.डी., टपाल जीवन विमा, राष्टÑीय बचत प्रमाणपत्रे व इतर असे वेगवेगळे बचत खाते उघडले आहे. साहजिकच खातेधारक रोखीने दर महिन्याला हप्त्यांची रक्कम येथील टपाल कार्यालयात भरत असतात. तथापि ८ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने हजार व ५०० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांना पन्नास दिवसानंतरही आजपावेतो पुरेशी रक्कम मिळत नाही.
पैशांसाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे़ असे विदारक चित्र असताना येथील टपाल कार्यालय, नागरिक आणि कर्मचाºयांना बचत खात्याचे हप्ते भरण्यासाठी रोकडची मागणी करीत असल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे़ दरम्यान, कर्मचारी हप्ते धनादेश देतात तेव्हा धनादेश स्वीकारण्यास नकार देत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
टपाल विभागाच्या अशा मनमानी धोरणाबाबत कर्मचाºयांचे हप्ते पैशांअभावी थकले असल्याने परिणामी त्यांना नाहक दंडदेखील भरावा लागत आहे. वास्तविक केंद्र शासन चलन वाचविण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर मोठा भर देत आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कॅशलेस व्यवहार करावा यासाठी जनजागृतीही करीत आहे. परंतु केंद्र शासनाचेच असलेले टपाल कार्यालय कॅशलेस व्यवहाराविषयी उदासीन धोरण घेत असल्याने नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे़ राष्टÑीयकृत बँकांमध्ये टपाल कार्यालयाचे खाते नसल्यामुळे धनादेश स्वीकारता येत नसल्याचे म्हटले जात असले तरी टपाल विभागाच्या या मनमानी धोरणावर केंद्र शासनाने अंकुश ठेवून विविध बचत खात्यांचे हप्ते धनादेशाद्वारे स्वीकारण्यास सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, टपाल अधिकाºयांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला़
(तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीयकृत बँकांकडे टपाल कार्यालयाचे खाते नाही, त्यामुळे पी़एल़आय़ व इतर बचत खात्यांच्या रकमेचे हप्ते रोखीने घेण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत़
-हर्षल डोंगरे, पोस्टमास्तर