उपसभापती सुनील पाटील यांच्या अपात्रतेला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:54 PM2020-12-17T16:54:59+5:302020-12-17T16:56:12+5:30
उपसभापती सुनील भाऊसाहेब पाटील यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्रालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान स्थगिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सुनील भाऊसाहेब पाटील यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्रालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान स्थगिती दिली आहे. हा भाजपाला मोठा धक्का असल्याचा सूर व्यक्त झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ही स्थगिती देण्यात आली आहे.
सुनील पाटील हे भाजपाचे सदस्य म्हणून भोरस गणातून निवडून आले आहे. त्यांनी पक्षाचा आदेश डावलून विरोधी उमेदवाराला निवडीच्यावेळी समर्थन दिल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. १ जानेवारी २०२० रोजी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत सुनील पाटील यांनी भाजपाचा व्हीप डावलून राष्ट्रवादीचे उमेदवार अजय भाऊसाहेब पाटील यांना समर्थन दिले. यामुळे त्यांची सभापतीपदी निवड झाली. सुनील पाटील यांचीही उपसभापतीपदी वर्णी लागली. भाजपाचे सदस्य असूनही पक्षाचा व्हीप डावलला म्हणून गटनेते संजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी व युक्तिवाद होऊन अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील पाटील यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला.
या निर्णयाविरोधात पाटील यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर सुनावणी होऊन बुधवारी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. सुनावणीच्यावेळी संजय भास्कर पाटील व धनंजय ठोके आदी उपस्थित होते.