कुरंगी येथील वाळूसाठा उचलण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:39 PM2020-01-20T23:39:30+5:302020-01-20T23:39:36+5:30
पाचोरा : तालुक्यात कोणत्याही वाळू गटाचा लिलाव झालेला नसून कुरंगी येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळू साठ्याचा लीलाव होऊन ...
पाचोरा : तालुक्यात कोणत्याही वाळू गटाचा लिलाव झालेला नसून कुरंगी येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळू साठ्याचा लीलाव होऊन संबंधित ठेकेदाराच्या वाळू वाहतुकीत तफावत आढळल्याने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी तो वाळू साठा उचलण्यास स्थगिती दिली आहे.
कुरंगी येथील १३२२ ब्रास अवैध वाळू साठा सुमारे तीन महिन्यांपूर्वी महसूल प्रशासनाने जप्त केला होता. सदर वाळू साठ्याचा लिलाव होऊन महामार्गाच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने साठ लाख रुपये रॉयल्टी भरून वाळू साठा घेतला होता. यासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून व वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन महसूल प्रशासनाने सदर साठ्याची मोजदाद केली. यात उचल केलेला साठा व शिल्लक साठा यात तफावत आढळली. यासंदर्भात तहसीलदार कैलास चावडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा अहवाल व खनिकर्म विभागाच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सदर ठेकेदाराला साठ्यावरून वाळू उचलण्यास स्थगिती दिली असून तफावतीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान कुरंगी येथील वाळू गटास लिलाव करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यासंदर्भात तहसीलदार कैलास चावडे यांनी पाचोरा तालुक्यात गेल्या वर्षभरात १ एप्रिल पासून ३८ लाख रुपये दंड वसूल केला असून ३४ वाहने अद्यापही तहसील आवारात जप्त आहेत. १ ते १५ जानेवारी दरम्यान नऊ वाहने जप्त केली असून वरसाडे प्रबो येथील दीडशे ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. वाळू चोरीसंदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अवैध वाळूसाठे, वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले असल्याचे सांगितले. कुरंगी येथील वाळू ठेकेदारास उचलण्यास स्थगीती दिली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.