दमदार पावसाची ‘हंडी’ फुटली; कन्नड घाटात दरड कोसळली, राज्यात १० जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:05 AM2021-09-01T08:05:19+5:302021-09-01T08:05:35+5:30
जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला.
जळगाव/औरंगाबाद/अमरावती : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात झालेल्या लक्षणीय बदलाने मुंबईसह राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मंगळवारी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. शहरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले असून पाचशेवर जनावरे वाहून गेली आहेत. तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ३० जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. सोलापूर धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळण्यासह भूस्सखलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मराठवाड्यात ६७ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. विदर्भात ९ जिल्ह्यांत पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. नाशिक जिल्ह्यातही पाऊस झाला.
आजही कोसळणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात झालेल्या लक्षणीय बदलाने मुंबईसह राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, मंगळवारनंतर आता बुधवारीदेखील मान्सूनचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट, उर्वरित महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्राला यलो, तर विदर्भासह उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र -चाळीसगावला ७५० घरांमध्ये पाणी; ५०० जनावरे वाहून गेली
जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला सरासरी ७८ मिमी पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. शहरातील ७५० घरांमध्ये पाणी शिरले असून सुमारे ५०० जनावरे वाहून गेली आहेत. वाकडी येथील ६० वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. या पुराचा चाळीसगाव तालुक्यातील ३३ गावांना फटका बसला आहे. भडगाव तालुक्यातही पाऊस झाला. नगर जिल्ह्यात पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. जनावरे, वाहने पाण्यात वाहून गेली. नद्या, नाल्यांना पूर आला. नाशिक जिल्ह्यातही रात्री दमदार पाऊस झाला.
कुठे काय घडले ?
मराठवाडा -
मराठवाड्यातील ६७ मंडळांना मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर-धुळे महामार्गावरील औट्रम घाटात ढगफुटी झाल्याने दरड कोसळली तर डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला. त्यामुळे घाटात अनेक वाहने अडकली. बीड जिल्ह्यातील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत तालुक्यात अनेक गावांचा तसेच जालना जिल्ह्यातील पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला.
विदर्भ-
विदर्भात मंगळवारी पूर्व विदर्भातील तीन जिल्हे वगळता सर्वदूर पाऊस झाला. कुठे मुसळधार, तर कुठे रिपरिप सुरू आहे. तथापि, अनेक जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोघे वाहून गेले. वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत पंधरवड्यानंतर पावसाने पुन्हा फेर धरला आहे.
पश्चिम महाराष्ट्र-
सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी अधून मधून भुरभूर होती परंतु पावसाचा जोर कुठही नव्हता.