जळगावच्या बाजारपेठेत बटाट्याचे भाव आले निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:58 AM2019-01-04T11:58:19+5:302019-01-04T11:58:48+5:30
बाजारपेठेत बटाट्याची आवक वाढली असून भाव महिनाभरात निम्म्यावर आले आहेत.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक काही दिवसांपासून चांगली आहे. बटाट्याची आवकही वाढली असून भाव महिनाभरात निम्म्यावर आले आहेत. सध्या समितीमध्ये ९०० क्विंटलच्या आसपास बटाट्यांची आवक होत असून, ४०० ते ६०० प्रति क्विंटल असा भाव आहे. मागील महिन्यात हाच भाव दुप्पटीने होता. हळूहळू हे दर घसरत गेले.
भाजीपाल्यामध्ये मेथीचे दर केवळ १००० ते १५०० प्रति क्विंटल असे आहेत. याहीपेक्षा फुलकोबी स्वस्त असून, ८०० ते १००० असा भाव आहे. इतर भाज्यांमध्ये वांगी ९०० ते २१००, भेंडी २००० ते २५००, अद्रक २५०० ते ४५००, हिरवी मिरची १५०० ते २०००, गंगाफळ १०००, बिट १५०० ते २०००, शेवगा शेंग ३१००, लिंबू १२०० ते २८००, लाल कांदा ३२५ ते ८००, पांढरा कांदा ३५० ते १००० याप्रमाणे सर्वच भाजीपाल्याचे दर अवाक्यात आहे. सध्या विविध प्रकारच्या भाज्यांची चांगली आवक आहे.