वरुणराजाच्या कृपेने प्रशासनाचीही आबादानी..... जळगाव जिल्ह्याचा संभाव्य टंचाई आराखडा ३६ कोटींवरून १४ लाखावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:58 AM2020-01-05T11:58:50+5:302020-01-05T12:04:31+5:30
केवळ अमळनेर व पारोळ््यात टंचाईची शक्यता
जळगाव : जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची अधिकच मेहरनजर दाखविल्याने संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा यंदा केवळ १३ लाख ९० हजार रूपयांचा असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चांगला पाऊस झाल्याने प्रथमच एवढ्या कमी रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलना पाहता हा आराखडा ३६ कोटी रुपयांवरून केवळ १३ लाख ९० हजारावर आला आहे.
जिल्ह्यात यंदा १३८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली. त्यामुळे तलाव, धरणेही ओसंडून वाहिले. जानेवारी महिन्यातदेखील नद्या, तलावांना चांगले पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी तयार होणारा आराखडा तयार करण्यावरून प्रशासनात पेच निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने या वर्षासाठी सुरुवातीला २ कोटी ३८ लाखांचा आराखडा तयार केला होता. मात्र जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांची पाणी स्थिती लक्षात घेता हा आराखडा जिल्हा परीषदेकडे परत पाठविण्यात आला होता. शनिवारी सुधारीत आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.
अमळनेर व पारोळा तालुक्यातच पाणीटंचाईची शक्यता
नव्याने तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात यंदा अमळनेर तालुक्यातील ९ आणि पारोळा तालुक्यातील ९ अशा एकूण १८ गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यासाठीचा खर्च १३ लाख ९० हजार रुपये प्रस्तावित आहे. यात प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा ३६ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. यावेळी मात्र जिल्ह्यात तब्बल १३८ टक्के पाऊस झाल्याने आराखडा अवघा १३ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.