जळगावात बाप्पाच्या विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:35 PM2018-09-01T12:35:00+5:302018-09-01T12:37:04+5:30
मार्गावर ८६ खड्डे
विजयकुमार सैतवाल
जळगाव : अवघ्या १२ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची मंडळांकडून जोरदार तयारी सुरू असली तरी बाप्पाच्या विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’ कायम आहे. या मार्गाच्या सुरुवातीपासूनच खड्यांना सुरुवात होऊन निरोपाच्या अखेरच्या टोकावरदेखील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.या मार्गावर जागोजागी तब्बल ८६ खड्डे असल्याचे आढळून आले.
१३ सप्टेंबर रोजी बाप्पांचे आगमन होत असून त्यासाठी शहरात मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. असे असले तरी मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष कायम असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले असून तेवढा दिलासा आहे, मात्र उर्वरित खड्डे एवढ्या कमी दिवसात बुजविण्याचे आव्हान मनपा समोर आहे.
रस्त्यांच्या या दुरवस्थेसंदर्भात शुक्रवारी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली असता या मार्गाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टोकापर्यंत ८६ खड्डे आढळून आले.
बालाजीपेठ रस्ता ते रथचौकापर्यंत २२ खड्डे
बालाजीपेठ परिसरातून रथ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच खड्डा आहे. त्यावर दगडदेखील ठेवलेला असल्याचे दिसून आहे. या ठिकाणापासून ते रथ चौकापर्यंत तब्बल २२ खड्डे आढळून आले. विशेष म्हणजे अरुंद असलेल्या या रस्त्यावर अगोदरच वाहनांची मोठी वर्दळ असते व त्यात खड्यांच्या डोकेदुखीने नेहमीच वाहनधारकांना मनस्ताप होतो. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरी या रस्त्याचे भाग्य उजळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढे सराफ गल्लीच्या सुरुवातीपासून ते सुभाष चौकात रस्ता चांगला असला तरी आठवडे बाजार चौकापर्यंत तीन खड्डे असल्याचे आढळून आले.
लहान मोठे अडथळे कायम
बी.जे. मार्केट समोर रस्त्यांचे काम केले असले तरी तेथून पुढे पांडे डेअरी चौकापर्यंत काही ठिकाणी लहान मोठे अडथळे आहे. या सोबतच पांडे डेअरी चौकात आजूबाजूला असलेले खड्डे त्रासदायक ठरणारे आहेत.
पांडे डेअरी चौक ते सिंधी कॉलनी दरम्यान झाली डागडुजी
पांडे डेअरी चौकापासून पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनीचा रस्ता असे थेट इच्छादेवी चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले आहे.
शिरसोली नाक्यानजीक रस्त्याची चाळणी
इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यापर्यंतकॉंक्रीटचा चांगला रस्ता असला तरी या दरम्यान तीन खड्डे आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी ते धोकादायक ठरू पाहतात. शिरसोली नाक्याच्या अलीकडे तर रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे.त्यामुळे येथे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.
गायत्रीनगर ते नेहरू नगर दरम्यान मोठे ७ खड्डे
शिरसोली नाक्यापासून पुढे रस्त्याची चांगली अवस्था असून येथून भरधाव वेगाने वाहने जातात. मात्र गायत्रीनगर ते नेहरू नगर दरम्यान मोठे सात खड्डे आहेत. साधारण चार ते पाच इंच खोलीचे हे खड्डे नेहमी वाहनांसाठी धोकेदायक तर आहेच सोबतच विसर्जन दरम्यान गर्दीत ते न दिसल्यास गणेशभक्तांसाठी त्रासदायक ठरू शकतात, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.
सेंट टेरेसा शाळा ते तलावापर्यंतच्या रस्त्याची चाळणी
शिरसोली रस्त्यावरून सेंट टेरेसा शाळेकडून मेहरुण तलावाकडे खाली उतरतानाच सुरुवातीपासून रस्त्याची चाळणी झालेली आहे. उतार असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांचा तोलही जातो. पुढे थेट मेहरुण तलावापर्यंत हा रस्ता पूर्णपणे खराब आहे. त्यात मध्येच खोलगट भाग असल्याने तेथे पाणीही साचलेले आहे.
सेंट टेरेसा ते श्रीकृष्ण लॉन दरम्यान ३१ खड्डे
काही गणेश भक्त सेंट टेरेसा शाळेकडे वळणाºया रस्त्याच्याही पुढे जाऊन शिरसोली रस्त्यावरून मेहरुण तलावाकडे विसर्जनासाठी जातात. सेंट टेरेसा शाळा ते श्रीकृष्ण लॉन दरम्यान ३१ खड्डे असून वाहनधारकांना त्यातून मार्ग काढत जावे लागते.