पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:51+5:302021-07-20T04:12:51+5:30

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर ...

The power outage continues even after the pre-monsoon works | पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

Next

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर आता वादळी-वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. विशेष म्हणजे, पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील वाघनगर, खेडी परिसर, जुने जळगाव, शनीपेठ, कांचननगर, पिंप्राळा, तसेच आव्हाणे, शिरसोली, रायपूर, असोदा या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर शिरसोली येथे ३० तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर असाच प्रकार एमआयडीसीतील घडला. अशा प्रकारे शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात दर दिवसाआड वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घडत आहे, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यावर शहरातील ठिकठिकाणचे महावितरणच्या कार्यालयांमधील कर्मचारी नागरिकांचे फोनही घेत नसल्यामुळे, नागरिकांमधून शहर महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

अधिकारी म्हणतात, फक्त शनिवारीच होतो वीजपुरवठा खंडित

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना, दुसरी शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी मात्र शहरात कुठेही वीजपुरवठा खंडित होत नसल्याचा दावा केला, तर फक्त शनिवारीच महावितरणतर्फे विविध ठिकाणचे तांत्रिक कामे हाती घेतली जातात. त्यामुळे आठवड्यातून फक्त शनिवारीच वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत, माझ्यापर्यंत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येत नसल्याचे सांगितले. मात्र, कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित झाल्यावर फोनच उचलण्यात येत नसल्यामुळे, वीजपुरवठा खंडित होण्याची तक्रार कशी समजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

सहा महिन्यांपासून शहराचा कारभार ‘प्रभारी’अभियंत्यांवर :

जळगाव शहराचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय तडवी यांची सहा महिन्यांपूर्वी मनमाडला बदली झाल्यानंतर, महावितरणतर्फे त्यांच्या रिक्त जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराचा महावितरणचा कारभार प्रभारी अभियंता म्हणून एन.बी. चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. तडवी यांची बदली झाल्यापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, चौधरी यांच्या जागी महावितरणने पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: The power outage continues even after the pre-monsoon works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.