वीजपुरवठा खंडित होणे ही झाली नित्याचीच बाब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:05+5:302021-07-13T04:06:05+5:30
भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही ...
भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत ही समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना निवेदन दिले असून ही समस्या न सुटल्यास वीज बिल न भरण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, जितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम, नितीन गोरे, वेभव बर्गे, वरुण अग्रवाल, चेतन मेंढारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
केवळ लॉकडाऊनमध्येच पुरवठा सुरळीत?
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अखंड वीजपुरवठा देणाऱ्या महावितरणला आता सुरळीत वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ लॉकडाऊन असेल तरच महावितरण सुरळीत वीजपुरवठा करू शकते का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तांत्रिक कामाच्या नावाखाली खंडित होतो वीजपुरवठा
शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. अशात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. उन्हाळा नसतानाही केवळ तांत्रिक कामाच्या नावाखाली देखभाल, दुरुस्तीअभावी महावितरण सुरळीत वीजपुरवठा करूच शकत नसल्याचे बोलले जात आहे.
दरात वाढ कायम, समस्या मात्र सुटेना
दरवर्षी महावितरणकडून वीजदरात वाढ करण्यात येते. त्या तुलनेत सुविधा मात्र देण्यात येत नाहीत. शहरातील ८५ टक्के भागांत वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर खेळखंडोबा सुरू आहे. अनेक भागांमध्ये व्होल्टेजची समस्याही कायम आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.