साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:36+5:302021-03-29T04:10:36+5:30

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन १५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक लोकमत ...

Power outage of six and a half thousand arrears farmers | साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

Next

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

१५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावितरणतर्फे गेल्या १५ दिवसांपासून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी पंपाचे थकबाकीदार असलेल्या जळगाव जिह्यातील सुमारे साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंपधारक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र, देण्यात आलेले वीज बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी करीत, बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली होती. ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे.

इन्फो :

तर इतर ग्राहकांप्रमाणे कृषी पंपधारकांवरही कारवाई

महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्चपासून वीज बिल न भरलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये कृषी पंपधारक शेतकरी बांधवांचाही समावेश आहे. त्यानुसार गेल्या १५ दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ४९१ शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मध्ये सर्वाधिक पाचोरा विभागातील २ हजार ३५५ ग्राहकांचा तर त्या खालोखाल धरणगाव विभागातील १ हजार १२८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

इन्फो

शेतकरी बांधवांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

शासनाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तसेच थकबाकीवरील व्याज व विलंब आकारही माफ केला आहे. शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेचा शेतकरी बांधवांना ३१ मार्च २०२२ पर्यंत लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

इन्फो

शासनाच्या आदेशानुसार महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, यात शेतकरी बांधवांना शासनाने पहिल्यांदाच कृषी पंपाच्या थकबाकी वीज बिलावर ५० टक्के सवलत दिली आहे. त्यांनी तत्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच ज्या गावातून कृषी पपांची जितकी वसुली होईल, त्यातील ३३ टक्के निधी त्या गावातील विजेच्या विकास कामांवरच खर्च करण्यात येणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

इन्फो

विभागनिहाय वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्याकडील थकबाकी

विभाग ग्राहक थकबाकी

१) भुसावळ : ७०३ ६ कोटी ४२ लाख ६४ हजार

२) चाळीसगाव ९५४ १ कोटी ४९ लाख २ हजार

३) धरणगाव : ११२८, ५ कोटी १ लाख ४ हजार

४) जळगाव ग्रामीण : १४५, १ कोटी १८ लाख ५९ हजार

५) मुक्ताईनगर : ३३८, १ कोटी ७७ लाख २४ हजार

६) पाचोरा : २ ३२५, ४ कोटी ३५ लाख ९ हजार

७) सावदा : ८९९, १४ कोटी २६ लाख २७ हजार

एकूण : ६ ४९१, ३४ कोटी ५१ लाख ६ हजार

इन्फो

जिल्हाभरात २ हजाराहून अधिक थकबाकी

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सध्या ३ लाखांच्या घरात कृषी पंप ग्राहकांची संख्या असून, त्यांच्याकडे सद्यस्थितीला २ हजार कोटींच्या घरात थकबाकी आहे. तर वसुली फक्त १० टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Power outage of six and a half thousand arrears farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.