महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:11+5:302021-07-04T04:12:11+5:30
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात ...
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, महिना उलटूनही हा निधी वर्ग करण्याबाबत जिल्हा प्रशासन अथवा मनपा प्रशासनाकडून अद्याप महावितरणकडे निधी वर्ग न केल्यामुळे, विद्युत खांब हटविण्याचे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. त्यामुळे महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही, हे काम सध्या ५० टक्केच पूर्ण झाले आहे. तर पुलाचे जिल्हा परिषदेच्या बाजूने बाहेरील काम वर्षभरापासून बंद आहे. या ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब व उच्च क्षमतेच्या विद्युत लाईनचा अडथळा असल्याने हे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. विद्युत खांब हटविण्यासाठी मनपा अथवा जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे, गेल्या महिन्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मनपाच्या शिल्लक असलेल्या साडेचार कोटींच्या निधीतून दीड कोटींचा निधी खांब हटविण्यासाठी महावितरणला देण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.
मात्र, महिना उलटूनही महावितरणकडे हा निधी वर्ग झालेला नाही. महावितरण प्रशासनाने खांब हटविण्यासाठी गेल्या वर्षीच निविदा प्रक्रिया राबविली असून, नियुक्त केलेल्या मक्तेदारामार्फतच हे काम केले जाणार आहे. मात्र, नियमानुसार संबंधित मक्तेदाराला कामाची वर्क आर्डर देण्यासाठी महावितरणकडे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे, ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून निधी मिळाल्यावरच खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
पुलाची वाढीव मुदत दोन महिन्यात संपणार
कोरोनामुळे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे गेल्यावर्षी मधल्या काळात अनेक महिने काम बंद होते. यामुळे पुलाच्या कामाला अधिकच विलंब झाला. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फेब्रुवारीत पुलाची मुदत संपल्यानंतर, आणखी सहा महिने मुदत वाढ देऊन, ही मुदतवाढ आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मात्र, अद्यापही पुलाचे काम म्हणावे तसे प्रगतीपथावर नसल्याने, या वर्षांतदेखील पुलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.