विसर्जन पूर्ण होईपर्यंत नियुक्त राहणार वीज कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:40 PM2019-09-10T12:40:17+5:302019-09-10T12:41:03+5:30
महावितरण : लोंबकळलेल्या तारा व वाकलेल्या खांब्यांची दुरुस्ती
जळगाव : विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत तारा अथवा वीज पुरवठा वायरींचा कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी विसर्जन पूर्ण होईपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर महावितरणचे कर्मचारी चौकाचौकात नियुक्त राहणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच मिरणवणुकीच्या मार्गावरील काही ठिकाणच्या लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांब्याचींही दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.
गणरायाचे १२ रोजी विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणतर्फे करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत संपर्क साधला असता तडवी त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवापूर्वीच शहरातील सर्व लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांब्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच विद्युत तारांच्या ठिकाणी धोकेदायक ठरणाºया झाडांच्या फांद्याही तोडण्यात आल्या. तसेच उघड्यावरील ट्रान्सफार्मरांना संरक्षण जाळी बसविण्यात आल्या आहेत.
चौकाचौकात राहणार वीज कर्मचारी
कोर्ट चौक ते थेट मेहरुण तलावापर्यंत या विसर्जन मिरवणुकीच्या शाखा अभियत्यानांही त्यांच्या परिसरातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या मंडळांच्या २५ ते ३० फुटांच्या वर मूर्ती आहेत,अशा मंडळाच्या मिरवणुकीच्या मार्गावरही कुठेही विद्युत तारांचा अडथळा येऊ नये, यासाठी महावितरणचे कर्मचारी विसर्जन होईपर्यंत देखरेख ठेवतील. तसेच मेहरुण तलावावरही कर्मचारी नियुक्त राहणार असून, विसर्जनाच्या दिवशी विजेच्या संदर्भात समस्या उद्भवल्यास महावितरणच्या शाखा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमाकांवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.