शिरसोली येथील पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:40+5:302021-03-13T04:29:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरसोली, ता. जि. जळगाव : शिरसोली प्र. न. व प्र. बो. या दोन्ही गावांना पाणी पुरवठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसोली, ता. जि. जळगाव : शिरसोली प्र. न. व प्र. बो. या दोन्ही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सामूहिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरसोलीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शिरसोली प्र. न. व शिरसोली प्र. बो. या दोन्ही गावांची सामूहिक पाणी पुरवठा योजना आहे. या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी दापोरे गावातील गिरणा नदीपात्राच्या काठावर विहीर खोदण्यात आली आहे. याच विहिरीतील पाणी शिरसोली येथे बांधलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांद्वारे ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचते. दोन्ही गावांची लोकसंख्या चाळीस हजारांच्या घरात असल्याने दोन्ही गावांना आठ दिवसांच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळते.
या पाणी योजनेची थकबाकी असल्याने महावितरण कंपनीने दिनांक ११ मार्च रोजी वीज खंडित केली आहे. ग्रामपंचायतीने वीजबिल भरण्याबाबत कार्यवाही करावी तसेच वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.