चाळण-गाळण यंत्रासाठी वीज यंत्रणा मोफत उभारणार-पालकमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:43+5:302021-07-25T04:14:43+5:30
अमळनेर : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणारी अमळनेर बाजार समितीतील गाळण-चाळण यंत्रणा सुरू करण्यासाठी वीज कंपनीतर्फे शासनाच्या एन.एस.सी. योजनेतून ...
अमळनेर : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणारी अमळनेर बाजार समितीतील गाळण-चाळण यंत्रणा सुरू करण्यासाठी वीज कंपनीतर्फे शासनाच्या एन.एस.सी. योजनेतून मोफत वीज यंत्रणा उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजार समितीत बोलताना दिली.
प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील हजर होते. बाजार समितीतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचा समतोल साधला जात आहे. आतापर्यंत साडेतीनशे कोटी उपलब्ध करून दिले आहेत. साहेबराव पाटील यांची कामाची पद्धत आणि धडपड कौतुकास्पद आहे म्हणून पालिकेला विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून १२ कोटी रुपयांची कामे दिली आहेत.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी ७० कोटी त्यांनी माझ्या विनंतीवरून उपलब्ध केल्याने तालुक्याला प्रगतीची दिशा मिळाली आहे.
प्रास्ताविक करताना मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी गाळण-चाळण यंत्रणेसाठी वीज यंत्रणा उभारण्यासाठी पाच-सहा लाख रुपये खर्चाची समस्या सांगितली. लवकरच बाजार समितीचा पेट्रोलपंप आणि शेतकऱ्यांच्या मालासाठी कोल्ड स्टोरेज सुरू करणार असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन प्रशासक बी. के. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, प्रा. सुरेश पाटील, एल. टी. पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, श्रीकांत पाटील, चंदन पाटील, विश्वनाथ पाटील, गजानन पाटील, आशा चावरिया, कौसर शेख, हरी भिका वाणी, विद्युत अभियंता प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.