काही कळण्याआधीच वीज कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:31+5:302021-06-10T04:12:31+5:30
कासोदा/ तळई ता. एरंडोल : जिल्ह्याच्या काही भागात मृगाचे आगमन झाले. यात तळई, ता. एरंडोल झाडावर वीज ...
कासोदा/ तळई ता. एरंडोल : जिल्ह्याच्या काही भागात मृगाचे आगमन झाले. यात तळई, ता. एरंडोल झाडावर वीज पडल्याने दोन जणांचे बळी घेतले. काही कळण्याच्या आत वीज कडाडली व झाडावर पडली आणि शेतकऱ्यासह तरुणाचाही जीव गेला. यात सुदैवाने सात जण बचावले आहेत. यातील पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
तळई येथे बुधवारी दुपारी ३-३०च्या सुमारास गावाजवळील पांढरीच्या शेतात हे वीज तांडव पाहायला मिळाले. भोकरच्या झाडावर अचानक वीज पडून शेतकरी विक्रम दौलत चौधरी (५२), भूषण अनिल पाटील (१८) हे ठार झाले. या शेतात झाडाखाली एकूण ८ जण होते. इतर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
९ रोजी पावसाळ्यापूर्वीच शेतीच्या कामासाठी शेतात असतानाच अचानक दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला जोरात सुरुवात झाल्यामुळे शेताच्या बांधावर असलेल्या भोकरच्या झाडाखाली हे आठ जण आसरा घेण्यासाठी थांबले होते, त्यात काही कळण्याच्या आत जोरदार वीज कडाडली, त्यात विक्रम चौधरी हे जागीच ठार झाले, तर वीज पडल्याने जखमी झालेल्यांना बैलगाडीत टाकून गावात आणण्यात आले, नंतर इतर जखमींना जळगावी उपचारांसाठी पाठवण्यात आले, परंतु भूषण पाटील या तरुणाचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे.
चौकट
हे सात जण बचावले
तळईनजीक बुधवारी झालेल्या या विजेच्या तांडवात शांताराम आनंदा धनगर, योगेश रवींद्र धनगर, रमेश कौतिक धनगर, निवृत्ती रमेश धनगर, संदीप वामन वाघ, सुरेश हरी पाटील व विजय नामदेव नाईक हे व इतर लोक बचावले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आडगाव, ता. एरंडोल येथे भर दुपारी वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर तळई येथील घटना शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन आली आहे. विक्रम चौधरी यांची अंत्ययात्रा रात्री ८-१५ वाजेला तळई येथून शोकाकुल वातावरणात काढण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. भूषण पाटील हा ११वीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तीन बहिणींचा एकुलता भाऊ असून पिण्याच्या पाण्याचे जार विक्रीचा व्यवसाय करीत होता, आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
एरंडोल
एरंडोल : येथे पावणेतीन वाजेच्या सुमारास मेघगर्जना व जोरदार वाऱ्यासह बुधवारी पावसाचे आगमन झाले. यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभीच वरुण राजाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला, तर शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
चाळीसगाव : मंगळवारी आणि बुधवारीही चाळीसगाव परिसरातील काही भागात मृगाने हजेरी लावत ८ रोजीचा मुहूर्त बरोबर साधला. मान्सूनच्या हलक्या सरी बळीराजासाठी उत्साहवर्धक ठरल्या असून शेतशिवारातील लगबग वाढली आहे. या सरींनी ‘पेरते व्हा’ असाच संदेश दिला आहे. दमदार पावसानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल वाढणार आहे. जिल्ह्यात याशिवाय सायगाव, कजगाव, कढोली येथे जोरदार पाऊस झाला आहे.
........
चौकट
मृग सरी अन् वाहन गाढव
८ रोजीपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. यंदा मृग नक्षत्राला सरींनी सलामी दिल्याने शेतकरी आनंदित झाले असले तरी, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्राचे वाहन गाढव आहे. पुढचे १३ दिवस मृग नक्षत्राचे असून २१ पासून आद्रा नक्षत्राला सुरुवात होणार आहे.