जळगावात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:17 PM2018-03-16T13:17:06+5:302018-03-16T13:17:06+5:30
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गु गुढीपाडव्याढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गुरुवारी मोठी गर्दी होती. दुचाकी, कार, ए.सी. एलईडी, फ्रीज यांना सर्वाधिक मागणी आहे तर वॉशिंग मशिन, ओव्हन यांना त्या खालोखाल मागणी आहे. पाडव्याच्या दिवशी नवीन ९०० दुचाकी व १०० चारचाकी वाहने विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. पाडव्यासाठी हार- कंगन यांच्याही खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे फुले मार्केट, गोलाणी मार्केट परिसर गर्दीने फुलला होता.
वाहन बुकिंग जोरात
हिंदू नववर्षाला विविध वस्तू खरेदीला मोठे महत्त्व दिले जाते. त्यानुसार पाडव्याला मनाजोगे वस्तू मिळावी म्हणून गेल्या आठवड्यापासूनच बुकिंग केले जात आहे. यात बुधवार, गुरुवारी तर आणखी भर पडली. शहरातील दुचाकीच्या एकाच दालनात गुरुवारपर्यंत २५०हून अधिक दुचाकींचे बुकिंग झालेले होते. त्यात शुक्रवार, शनिवार आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला ९०० दुचाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
चारचाकींनाही मागणी
चारचाकी वाहनांनाही चांगली मागणी असून त्यांचेही बुकिंग केले जात आहे. पाडव्याला १००पेक्षा अधिक चारचाकी विक्री होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
एसीला सर्वाधिक मागणी
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्याही बाजारात रेलचेल असून यंदा एसीला सर्वाधिक मागणी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर यंदा ३५०हून अधिक एसी विक्री होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला. या सोबतच एलईडी, फ्रिज यांना मागणी असून त्या खालोखाल वाशिंग मशिन, ओव्हनला मागणी आहे. यंदा तर कंपन्यांनी मोठ्या एलईडीवर छोटा एलईडी, मोठ्या फ्रिजवर छोटा फ्रिज दिला जात असल्याने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
होळी प्रमाणे गुढीपाडव्यालाही हार कंगन ला महत्त्व आहे़ यासाठी यंदादेखील विक्रेत्यांनी विविध प्रकारचे हार-कंगन बनविले आहेत़ १०० ते १२० रुपये किलो असा बाजारभाव असून त्यांना मागणी आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकींना चांगली मागणी असून बुकिंगही जोरात सुरू आहे.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
यंदा एसीला सर्वाधिक मागणी असून त्या खालोखाल एलईडी, फ्रिज यांची विक्री होत आहे. कंपन्यांनी विविध आॅफर्स दिल्याने त्याचाही ग्राहक लाभ घेत आहे.
- दिनेश पाटील, विक्रेते.