असाध्य ते साध्य करीता सायास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:23 PM2019-01-21T21:23:22+5:302019-01-21T21:23:30+5:30
सामान्य कुटुंबात जन्मलेले तुकोबाराय सतत साधनेच्या बळावर ‘आकाशा एवढे’ बनू शकले आणि चोखाबारायांना पांडुरंगाने आपल्या पायरीशी जागा दिली.
संतांनी केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण समाजाला दिली नाही, तर प्रयत्नवादाचेही संस्कार मराठी मनावर केले आहेत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असे आपण म्हणतो. त्यासाठी सातत्याच्या प्रयत्नांची गरज आहे. अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्ञानदेव महाराज देखील सांगतात. ‘‘म्हणौनि अभ्यासासी काही । सर्वथा आन नाही । या लागी तु माझ्या ठायी । अभ्यास मिळे ।। प्रपंच करताना जसा अभ्यास आवश्यक आहे तसा परमर्थातही अभ्यास आवश्यक आहे. अभ्यासाने विष पचवता येते. अभ्यासाने व्याघ्र सर्पादी प्राणी वशीभूत करता येतात. असाध्य ते साध्य करीता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। अशा शब्दात अभ्यासाचा म्हणजेच प्रयत्नवादाचा महिमा तुकोबाराय सांगतात.
प्रयत्न करत असताना खचून जाण्याचे, अपयशाच्या संभावनेचे क्षण कदाचित येतील ही पण त्यावेळी प्रयत्न सोडून न देता आपली साधना अविरत सुरू ठेवली पाहिजे. होणार नाही, जमणार नाही, असे या जगात काहीच नाही. ‘नव्हे ऐसे काही नाही अवघड’ हा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. तो पटवून सांगण्यासाठी त्यांनी काही दृष्टांत दिले आहेत. खडक भेदून झाड वाढलेले आपल्याला दिसते. ऐन उन्हाळ्यातही हिरवे गार दिसते. त्यासाठी त्याची कोवळी लुसलुशीत मुळे ओल शोधण्यासाठी सतत खडकाशी झटत असतात. थोडी वाट मिळाली तरी त्यात अलगद प्रवेश करून पुढे जातात. मग त्या खडकाला दुभंगुन आपल स्थान निर्माण करतात. दोर हा काही चिरा कापण्याचे साधन नाही पण मोटेचा खालचा दोर सतत दगडाला घासून विहिरीवरच्या पाण्याच्या थाळण्याचा तो दगड चिरल्यासारख खाचा पडून झिजून जातो. मातेच्या उदरात बाळासाठी स्वतंत्र जागा कुठे असते? तरी तो इवलासा जीव दिसामासांनी वाढत जाऊन त्या उदरात जागा निर्माण करतोच ना! या सर्व गोष्टी सातत्याच्या प्रयत्नांनीच साध्य होतात. महाराष्ट्राचे माऊंटन मॅन म्हणून ओळखले जाणारे राजाराम भापकर गुरूजी यांनी गुंडेगाव ता.नगर या डोगरांनी वेढलेल्या गावात शासनाची दमडीही न घेता कधी श्रमदानाने तर कधी पदरमोड करून रस्त्यांची निर्मिती करतात. त्यासाठी चाळीस वर्षे आपला अर्धा पगार, निवृत्तीनंतरची सर्व रक्कम आणि पुरस्कारांची रक्कम खर्च सततच्या प्रयत्नांतून ४० कि.मी.रस्त्यांची बांधणी करतात. जिथे सायकलही जाऊ शकत नव्हती. त्या रस्त्यावरून एस.टी.धावू लागते हे प्रयत्नवादाचे फलित आहे. ८६ वर्षाचे भापकर गुरूजींचे उदाहरण आपल्यासमोर आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेले तुकोबाराय सतत साधनेच्या बळावर ‘आकाशा एवढे’ बनू शकले आणि चोखाबारायांना पांडुरंगाने आपल्या पायरीशी जागा दिली. पांडुरंगाच्या दर्शनाआधी चोखोबांच्या समाधीला केलेला नमस्कार हा प्रयत्नवादाला नमस्कार असतो. साधनेला वंदन असते.
- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.