उद्यानात सराव, सायकलवर साहित्याची केली ने-आण, अन् पटकावला नेमबाजीत मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:03+5:302021-07-04T04:12:03+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रायफल असोसिएशनकडून रेंजची व्यवस्था नव्हती. त्यावेळी १९८७ मध्ये शिवाजी उद्यानात आणि ...
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रायफल असोसिएशनकडून रेंजची व्यवस्था नव्हती. त्यावेळी १९८७ मध्ये शिवाजी उद्यानात आणि नंतर नवीपेठेतील नगरपालिकेच्या शाळेत नेमबाजीचा सराव सुरू होता. याच काळात पाच एअर रायफल, पाच फोल्डिंग लोखंडी स्टॅंण्ड आणि टार्गेट असे साहित्य तांबापुरासमोरून प्रशिक्षकांसोबत सायकलवर ने-आण केली. अन् अखेरीस जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचा मान गणेश दिलीप गवळी याने पटकावला. त्याने चेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या ज्युनियर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
जेव्हा कोणतीच सुविधा नव्हती तेव्हा पाच एअर रायफल, स्टॅण्ड असे साहित्य असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांच्या तांबापुरा समोरील कार्यालयातून प्रशिक्षक दिलीप गवळी, सुनील पालवे, प्रा.यशवंत सैंदाणे, विलास जुनागडे व दिलीप गवळी यांचे प्रकाश,ललित व गणेश हे तीनही लहान मुले सायकलींवर हे सर्व साहित्य ने-आण करीत होते. प्रकाश आणि ललित यांच्याप्रमाणेच गणेश यालाही नेमबाजीची आवड निर्माण झाली. कुटुंबातच नेमबाजी असली तरी गणेश याने नेहमीच एक पाऊल पुढे टाकले. ऑगस्ट १९९४ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत ओपन साईट एअर रायफलमध्ये तो सहभागी झाला. त्यानंतर मुंबईत १९९६ मध्ये राज्य नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले. तर १९९७ ला औरंगाबादला पहिले सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये खेळून यश मिळवले. मात्र २००१ ला चेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या ज्युनियर ऑलिम्पिक स्पर्धेत गणेश गवळी याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण ठरला. गणेशने २००२ ते २००८ या काळात इंडो-तिबेटियन पोलीस नेमबाजी संघाकडून खेळ केला. त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके देखील पटकावली. २००८ मध्ये गणेश महाराष्ट्र वन विभागात रुजू झाला. त्यानंतरदेखील ऑल इंडिया फॉरेस्ट मीटमध्ये तो महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतो. त्याने २०११ मध्ये देहरादूनला झालेल्या आणि २०१३ मध्ये हरियाणातील पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले आहे. तर २०१७ मध्ये हैदराबादला झालेल्या स्पर्धेत ५० मीटर प्रोन स्पर्धेत आणि थ्री पोझिशनमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
कोट - मी ज्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळू शकलो त्यात जळगाव रायफल असोसिएशनचे संस्थापक विशन मिलवाणी आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. साहित्याचा अभाव असतानाही त्यांनी ज्या पद्धतीने शिकवले त्याचा प्रत्येक स्पर्धेत मोठा फायदा झाला. - गणेश गवळी, नेमबाज.