अवसायक कंडारे याने सीआयडीचीही दिशाभूल केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:25+5:302020-12-06T04:16:25+5:30
सण्डे मुलाखत जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, अवसायक जितेंद्र कंडारे याच्या जागी दुसऱ्या अवसायकाची नियुक्ती करावी तसेच ...
सण्डे मुलाखत
जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, अवसायक जितेंद्र कंडारे याच्या जागी दुसऱ्या अवसायकाची नियुक्ती करावी तसेच संस्थेतील गैरव्यवहाराबाबत १४ जून २०१६ ते ११ जुलै २०२० या कालावधीत केंद्रीय सहकारमंत्री, केंद्रीय सहकार संचालक, पोलीस महासंचालक, सीआयडी, ईडी यांसह इतर ठिकाणी ४२ तक्रारी केल्या. खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष अधिकारी व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. सातत्याने पाठपुरावा केला, तेव्हा कुठे कारवाईचे सत्र सुरू झाले. दरम्यान, चौकशीदरम्यान अवसायक कंडारे याने सीआयडीचीही तपासात दिशाभूल केली, अशी माहिती ठेवीदारांसाठी लढणाऱ्या ॲड. कीर्ती रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रश्न : तुम्ही हा लढा कधीपासून सुरू केला. याआधी कधी चर्चा झाली नाही?
ॲड. कीर्ती पाटील : खरे तर २०१६ मध्येच बीएचआरबाबत सीबीआय, ईडी, सीव्हीसी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्याकडे तक्रारी करून चौकशीची मागणी केली. या विभागाकडून राज्याकडे पत्रव्यवहार व चौकशी सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याची चर्चा झाली नाही. २०१८ पासून आतापर्यंत ४२ तक्रारी केल्या. काही वेळा मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. आपण यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती दिली. याबाबत मी देखील कधीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही.
प्रश्न : बीएचआर संस्थेकडून तुम्हाला काय माहिती मिळाली?
ॲड. कीर्ती पाटील : संस्थेकडून माहितीच मिळत नव्हती. अवसायक कंडारे सतत टाळाटाळ करायचे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याला बोलावण्यात आले. मात्र, तेव्हा देखील मी केंद्राला बांधील आहे, राज्याला नाही, असे सांगून माहिती देणे टाळले. वकील म्हणून जेव्हा नियम व पोटनियमांची जाणीव करून दिली. तेव्हा पंधरा दिवसांत माहिती देतो, म्हणून सांगितले व तेव्हा देखील कंडारेने हात वर केले. शेवटी सुलोचना कर्नावट यांच्या माध्यमातून माहिती अधिकाराचा वापर केला. तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती मिळविली.
प्रश्न : आता पुढे काय भूमिका असणार
ॲड. कीर्ती पाटील : संचालक, अवसायक यांनी संस्थेचे वाटोळे केले आहे. अजूनही संस्थेच्या ताब्यात किती मालमत्ता आहेत. त्या विक्री करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी कशा परत करता येतील, यासाठी प्रयत्न राहणार आहे. प्रामाणिक अवसायकाची येथे निवड व्हावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांना ठेवी मिळालेल्या नाहीत. अनेकांच्या मुलांचे लग्न, शिक्षण व इतर कार्य याच ठेवींवर अवलंबून आहे व होते. त्यामुळे शेवटच्या ठेवीदाराला त्याची रक्कम कशी मिळेल, यासाठी पाठपुरावा करू.
इन्फो....
जाणूनबुजून कर्ज बुडविले
संस्थेतील अनेक कर्जदारांनी क्षमता असतानाही जाणूनबुजून कर्ज बुडविले आहे. त्याचा फटका ठेवीदारांना बसत आहे. बीएचआरने मालमत्ता त्यांच्या जवळच्या लोकांना कमी दरात विक्री केलेल्या आहेत. ३ मार्च २०१५ पासून संस्थेचे लेखापरीक्षण झाले नाही. नाशिकच्या एका लेखापरीक्षकाच्या लेखापरीक्षणात संस्थेत अनेक त्रुट्या आढळून आल्याने कंडारे याने त्यांना काढून टाकले. त्यामुळे तेव्हा लेखापरीक्षण अपूर्णच राहिले. सीआयडीचे अधिकारी तपासाला आले असता त्यांनाही पूर्ण माहिती न देता दिशाभूल करण्यात आली.
कोण आहेत ॲड. कीर्ती पाटील
ॲड. कीर्ती पाटील या माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. न्हावी (ता. यावल) येथील त्यांचे माहेर आहे. २०१५ पासून त्या जळगाव न्यायालयात वकिली करतात. इनरव्हील क्लब जळगाव ईस्ट, बॉक्स ऑफ हेल्थ व व्हीनस फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत. २०१७ पासून त्यांनी बीएचआर ठेवीदारांशी कायदेशीर मार्गाने लढा उभारला.
--