प्रदीप रायसोनी, चौधरींसह सहा जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:54 PM2019-02-15T12:54:14+5:302019-02-15T12:54:57+5:30

विमानतळ प्रकरण

Pradeep Raisoni, Chaudhary and six others bail | प्रदीप रायसोनी, चौधरींसह सहा जणांना जामीन

प्रदीप रायसोनी, चौधरींसह सहा जणांना जामीन

googlenewsNext
ठळक मुद्दे सिंधू कोल्हेंना समन्स; जनतेच्या पैशाचा गैरवापर


जळगाव : विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी गुरुवारी न्या.बी.डी.गोरे यांनी तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांच्यासह सहा जणांना प्रत्येकी २० हजाराचा जातमुचलका व २० हजार रुपयांचा रोख बॉँड यावर जामीन मंजूर केला. सिंधू विजय कोल्हे या गैरहजर असल्याने न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावले.
तत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५, गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. माजी मंत्री सुरेशदादा जैन, तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीप ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अ‍ॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत यांच्यासह ठरावावर सह्या करणाऱ्या नगरसेवकांविरुध्द हा गुन्हा दाखल झाला होता. यातील सुरेशदादा जैन व नगरसेवक वगळता वरिल सात जणांविरुध्द पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबत
समजपत्र बजावले होते. त्यानुसार मागील तारखेस चत्रभूज सोनवणे, माजी मुख्याधिकारी पंढरीनाथ काळे व धनंजय जावळीकर न्यायालयात उपस्थित होते, मात्र तेव्हा त्यांनी तारीख मागून घेतली होती. त्यानुसार १४ रोजी उपस्थित राहण्याचे न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे गुरुवारी सिंधू कोल्हे वगळता सर्व सहा संशयित न्यायालयात हजर झाले. दरम्यान वाघूर प्रकरण प्रकरणात नरेंद्र भास्कर पाटील यांच्यावतीने त्यांचे भाऊ विजय भास्कर पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वाघूर, विमानतळ व जिल्हा बॅँक प्रकरणाचा तपास राजकीय दबावाखाली होत असून चौकशी अधिकाºयांनी शिक्षेचे कलम वगळले आहे. तपासातही दिरंगाई होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणात २८ रोजी न्या.एस.एस.शिंदे यांच्या खंडपीठात कामकाज होणार आहे. त्यादिवशी तपासाधिकाºयांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, वाघूर प्रकरणात १९९९ ते २०१० या कालावधीत ठरावाला मतदान करणारे नगरसेवक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. सुरेशदादा जैन यांच्या बॅँक खात्यात ९ कोटी रुपये धनादेशाने जमा झालेले आहेत, असे असताना जैन यांच्यासह नगरसेवकांना का वगळले असेही याचिकेत म्हटले.

Web Title: Pradeep Raisoni, Chaudhary and six others bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.