बारावी परीक्षेत मू़जे़ची प्रांजल सोनवणे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:59 PM2019-05-29T12:59:30+5:302019-05-29T12:59:56+5:30
पेढा भरवून आनंदोत्सव
जळगाव : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शहरातील केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील आपले वर्चस्व राखले आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९५.२८ टक्के लागला असून वाणिज्य शाखेची प्रांजल विलास सोनवणे ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे़ तर हर्ष श्याम अग्रवाल व अक्षता बाळकृष्ण चौधरी या विद्यार्थ्यांनी ९५.२३ टक्के मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ विशेष म्हणजे, हर्ष याने अकॉउंट आणि गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे़
मंगळवारी बारावीचा निकाल रोजी जाहीर होण्याची तारीख येताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवगार्चीदेखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरातील, सायबर कॅफेंसह कॉलेजेसच्या परिसरात विद्यार्थ्यांनी निकालासाठी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा करताना दिसले. तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर अनेकांना चांगले मार्क्स मिळाल्याने मिठाई वाटून जल्लोष केला. मू़ जे़ महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनींनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला़
९६ टक्के गुण मिळवून प्रांजलची बाजी
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्रांजल विलास सोनवणे ही ९६ टक्के गुणांसह प्रथम आली. तिने शहरातून सुध्दा प्रथमक क्रमांक पटकाविला आहे़ तर अक्षता चौधरी, हर्ष अग्रवाल ९५़२३ टक्के मिळवून द्वितीय, जीत राका व अभिषेक पुराणिक ९४़४५ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ विज्ञान शाखेत अर्थव पाटील ९४़१५ टक्के मिळवून महाविद्यालयातून प्रथम आला आहे़
जळगावात मुलींचा ९०.०८ टक्के निकाल
गत वर्षाप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेच्या निकालात जळगाव जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात मुलींनीच आपली टक्केवारी जास्त राखली आहे. जिल्ह्यात मुलांचा ८४.२० टक्के तर मुलींचा ९०.०८ टक्के निकाल लागला आहे.