अमृतरावांचा शैक्षणिक वारसा चालविताहेत प्रमोद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:35 PM2018-12-17T15:35:29+5:302018-12-17T15:35:44+5:30
जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहे.
मोहन सारस्वत/ लियाकत सैय्यद
जळगाव : जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहे.
अमृतराव पाटील यांनी सलग २५ वर्षे शिक्षण संस्थेची धुरा सांभाळली. त्यांच्यानंतर प्रमोद पाटील हे गेल्या १५ वर्षापासून संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी संस्थेत डी.एड. महाविद्यालय, मोनालीसा इंग्लिश मीडियम स्कूल, विज्ञान शाखा व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरु केले.
संस्थेची रोटवद व नेरी येथे माध्यमिक शाळा आहे. नेरीला कनिष्ठ महाविद्यालय आहे. नेरी येथे स्वमालकीची सुसज्ज इमारत असून यात संगणक प्रयोगशाळा आहे. दोन्ही शाळांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
निकालाची उच्च परंपरा कायम आहे. प्रमोद पाटील हे वडिलांचा सहकार व राजकीय क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालवित आहेत. नेरी विकास संस्था, जामनेरातील पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
जळगाव येथील सहकार बोर्ड व पतसंस्था फेडरेशनचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्रमोद पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. प्रमोद यांच्या पत्नी वर्षा पाटील यांनी नेरी जि.प.गटाचे २००४ ते २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले.
कृषी पदवीधारक असलेल्या पाटील यांनी जळगावला पाटील बायोटेक या कृषी क्षेत्राशी संबंधीत कंपनी सुरु केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
स्व.अमृतराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यात माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते नेरीला झाले. त्यावेळी शरद पवार यांनी प्रमोद पाटील यांना अमृतरावांचा राजकीय व शैक्षणिक वारसा पुढे चालविण्याचा सल्ला दिला होता. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून ते वाटचाल करीत आहेत.