धावत्या रेल्वेला लटकलेल्या आजी व नातूचे वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:51 PM2019-03-19T16:51:08+5:302019-03-19T16:53:02+5:30
चाळीसगाव रेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी पावणे आठला मुंबईकडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगाव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून आजी व नातू धावत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध आजीला गाडी सुरू झाल्याचा अंदाज आला नाही.
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावरेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी पावणे आठला मुंबईकडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगाव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून आजी व नातू धावत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध आजीला गाडी सुरू झाल्याचा अंदाज आला नाही. तिने घाईत गाडीच्या दरवाजाजवळच्या पाईपला धरून नातवाला गाडीत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. गाडीत गर्दी असल्याने दरवाजाजवळच आजी व नातू लटकले होते. यावेळी पलाट क्रमांक तीनवर उभे असलेल्या प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता. आता आजी नातूला देवच वाचवेल, अशी अवस्था बघ्यांची झाली होती. अनेकांनी मोठ्याने आरोळ्या द्यायला सुरुवात केली व गाडी थांबविण्यासाठी गोंगाट केला. मात्र शहरातील पवार वाडीतील सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी यावेळी मोठ्या हिमतीने गर्दीतून सरळ आजी लटकलेल्या बोगीकडे धाव घेतली आणि आजीला व नातवाला धरून गाडीतून ओढले.
यावेळी आजीच्या पाठीला तर बबन पवार यांच्या हाताला जखम झाली. याप्रसंगी घडलेल्या थरारचा अनेकांनी अनुभव घेतला. उपस्थित शेकडो प्रवाशांनी बबन पवार यांच्या धाडसाचे कौतुक केले.
गाडीला लटकलेल्या अवस्थेत असलेली ६५ वर्षीयआजी व २० वर्षीय नातू हे काही सेकंदात गाडी खाली आले असते आणि जीव गमावून बसले असते. परंतु देवदूतासारखे धावून आलेले बबन पवार यांच्या हिमतीने दोघांचे प्राण वाचले. यावेळी प्रकाश जाधव व मनोज पाटील यांनी त्यांना धीर दिला. या घटनेची रेल्वे प्रवाशांमध्ये चर्चा दिसून आली.