लोभामुळे गमावला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:39 PM2018-08-25T14:39:01+5:302018-08-25T14:40:04+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संस्कार दीप’ या सदरात शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत लिहिताहेत बोधकथा...
एका अरण्यात एक भिल्ल राहत असे. तो शूर, धैर्यशील व श्रेष्ठ धनुर्धर होता. शिकार करूनच तो आपले जीवन व्यतीत करीत होता. त्याच्या कुटुंबाचे भरणपोषणही शिकारीवरच होत होते. अनेकदा तो आवश्यकतेपेक्षा अधिक शिकार करायचा. मग त्याला मीठमिरचीला दोन पैसे मिळत.
एका दिवशी शिकार करून तो घरी परतण्याच्या बेतात होता. तशी तो तयारी करीत होता. बांधाबांध झाली होतीच. तेवढ्यात त्याला एक मोठ्या शरीराचे जंगली डुक्कर दिसले. याची शिकार झाली, तर अधिक फायदा होईल असा त्याने विचार केला. त्याने भात्यातून एक तीक्ष्ण बाण काढला. त्या डुकरावर नेम धरून बाण मारला. त्याच्यावर जबर प्रहार झाला. डुक्कर घायाळ झाले. पण त्वरित मेले नाही. उलट त्या डुकराने भिल्लावर आक्रमण केले. त्याचे पोट फाडून त्याला मारले. थोड्या वेळाने ते जखमी डुक्करही तेथेच मरून पडले.
तेवढ्यात एक कोल्हा येथे आला. तो खूप भुकेला होता. डुक्कर व भिल्ल दोघांना मेलेले त्याने बघितले. भिल्लाने आधी केलेली एका प्राण्याची शिकारही तेथेच बाजूला ठेवलेली होती. माझं भाग्य फार चागलं आहे, असा त्याने मनाशी विचार केला. मी आता याचा हळूहळू उपयोग करीन पुष्कळ दिवस हे खाद्य मला उपयोगी पडेल.
मग तो मूर्ख कोल्हा सर्वात आधी तेथे पडलेल्या धनुष्याची तांत खाऊ लागला. थोड्याच वेळात तांत तुटली. त्यामुळे धनुष्याचा अग्रभाग अत्यंत वेगानं त्याच्या तोंडात आपटला. कोल्ह्याचे डोके फोडूनच तो धनुष्याचा अग्रभाग बाहेर पडला. लोभानं कोल्ह्याचा मृत्यू झाला.
तात्पर्य : लोभ धरू नये.
-प्रा.डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी, जळगाव