लग्नाच्या जेवणावळीत ५० हजारांच्या दंडाचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:16 AM2021-05-26T04:16:12+5:302021-05-26T04:16:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या ...

Prasad of fine of Rs | लग्नाच्या जेवणावळीत ५० हजारांच्या दंडाचा प्रसाद

लग्नाच्या जेवणावळीत ५० हजारांच्या दंडाचा प्रसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या चुका केल्या जात आहेत. लग्न समारंभामध्ये पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. शहरातील मेहरुण व रामेश्वर कॉलनीमधील लग्न समारंभामध्ये झालेल्या गर्दीमुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी वधू-वर पित्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभामध्ये ५० पेक्षा अधिक नागरिकांना सहभागी होण्यास बंदी घातली आहे. मात्र सोमवारी शहरातील रामेश्वर कॉलनी व मेहरुण परिसरात दोन लग्न समारंभांचे आयोजन केले होते. या दोन्ही लग्न समारंभांमध्ये १०० हून अधिक नागरिक सहभागी झाल्याचे मनपा पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे मनपा उपायुक्तांनी याबाबत वधू-वर पित्याला मंगळवारी नोटीस बजावली आहे.

प्रत्येकी ५० हजार रुपयांचा ठोठावला दंड, बजावली कारणे दाखवा नोटीस

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनी भागातील युवराज चिंधु रायसिंगे यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, याबाबतची नोटीस त्यांना पाठविण्यात आली आहे. यासह मेहरुण परिसरातील हनुमाननगर भागातील भास्कर रतन माळी यांनादेखील ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून, नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाकडून लग्न समारंभाबाबत आतापर्यंत करण्यात आलेली ही अकरावी कारवाई आहे. दरम्यान, सोमवारीच याबाबत मनपाच्या पथकाने लग्न समारंभामध्ये जाऊन व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

सहा दुकाने सील

मनपा प्रशासनाकडून मंगळवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या सहा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकाने सील करण्यात आली आहेत. मनपा प्रशासनाकडून आतापर्यंत शहरातील ५०० हून अधिक दुकाने सील करण्यात आली आहेत.

हरी विठ्ठल भागातील बाजार हटवला

मंगळवारी शहरातील हरी विठ्ठलनगर भागातील भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजार मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उठवून लावला. सकाळीच महापालिकेचे पथक या भागात दाखल झाले होते. तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याच्या आधीच मनपाच्या पथकाने विक्रेत्यांना या ठिकाणावरून हटवले.

Web Title: Prasad of fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.