अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:56 PM2018-10-01T16:56:21+5:302018-10-01T16:58:14+5:30
जळगाव : पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘हलगी सम्राट’ ने व्दितीय व औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या ‘आगाज’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला.
जळगाव : पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘पॉज’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘हलगी सम्राट’ ने व्दितीय व औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या ‘आगाज’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. भुसावळ येथील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाची ‘आली का’ या एकांकिकेने प्रायोगिक एकांकिका पुुरस्कार पटकाविला.
या चारही संघानी पुणे येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतीम स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. पुणे येथील महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ व मु.जे.च्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात पार पडली. रविवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषीक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड.सुशील अत्रे हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री स्वानंदी टिकेकर उपस्थित होती. त्यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केसीई संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर, महाराष्ट्रीय कलोपासक पुणेचे समन्वयक राजेंद्र नांगरे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी व परीक्षक सुहास परांजपे, नूतन धवणे, डॉ.बाळकृष्ण दामले आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य - सागर भडंगर (हलगी सम्राट, नूतन मराठा), सर्वोत्कृष्ट लेखक - धनश्री जोशी (आली का ?, नाहाटा महाविद्यालय), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अभिजित काळे (आगाज, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय (नैपुण्य)- नितीश कुळकर्णी (लाल चिखल, एसएसबीटीचे अभियांत्रिकी, बांभोरी), अभिनय (नैपुण्य स्त्री) - मोहिनी जोशी ( पॉज, प्रताप महाविद्यालय), अभिनय नैपुण्य पुरुष - दीपक बिºहारी ( पॉज, प्रताप महाविद्यालय), उत्तेजनार्थ - हनुमंत सुरवसे (हलगी सम्राट, नूतन मराठा), साक्षी वाणी (सेकंड हँड, महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, चोपडा), प्राजक्ता खिस्ते, उर्मिला सपकाळ (आगाज, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), मैथिली पुजारी (रूही, नेहरू अभियांत्रिकी, औरंगाबाद), श्रीकांत मंडलिक, श्रध्दा कांबळे (चने द्या चने, शासकीय अभियांत्रिकी, औरंगाबाद), श्रीकांत डाभे (लाल चिखल, एसएसबीटीचे अभियांत्रिकी, बांभोरी).