अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाला ‘अ’ प्लस दर्जा बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 08:09 PM2017-10-30T20:09:20+5:302017-10-30T20:13:22+5:30
उमविअंतर्गत हा दर्जा प्राप्त करणारे प्रताप हे पहिलेच महाविद्यालय ठरले असून नॅक समितीकडून हा गौरव करण्यात आला आहे.
लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.30 : प्रताप महाविद्यालयाला ‘नॅक’ समिती बंगळुरूने अ प्लस दर्जा प्रदान केला असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत हा दर्जा मिळवणारे ते पहिले महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयाला गतवैभव प्राप्त झाले असून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, शैक्षणिक साधने , विद्याथ्र्यांना पुरवल्या जाणा:या सुविधा आदींबाबत महाविद्यालय अग्रेसर ठरले आहे. याच मुद्यांवर आधारित नॅक समितीने 28 व 29 सप्टेंबर रोजी तिस:या फेरीच्या मूल्यांकनासाठी पाहणी केली होती . भारत सरकारच्या ‘नॅक’ या बंगळुरू स्थीत स्वायत्त संस्थेमार्फत महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. या समितीत ओरिसातील बेहरामपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी . एस. साहू, थिरुअनंतपुरमच्या अकॅडमीक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. सुधीर एस. व्ही. , बिहार येथील मुजफ्फरपूरच्या एम. एम. डी. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ममता राणी यांचा समावेश होता. समितीने प्रतापला 4 पैकी सीजीपीए 3.52 गुण दिल्याने प्रतापला ‘अ’ प्लस दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे . या यशासाठी कार्याध्यक्ष गोविंद मुंदडा, विनोद पाटील , संचालक डॉ . बी. एस. पाटील, बजरंग अग्रवाल, डॉ संदेश गुजराथी, मोहन सातपुते, जोतेंद्र जैन, कल्याण पाटील, चिटणीस प्रा . पराग पाटील, प्राचार्या डॉ. ज्योती राणे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांचे सहकार्य लाभले. या यशामुळे सर्वस्तरातून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘अ ’ प्लस दर्जा मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रतापला संशोधन व गुणवत्ता वाढीसाठी अधिक अनुदान मिळणार आहे . तसेच जादाच्या कोर्सेसला ही मान्यता मिळेल, त्यामुळे अनेक विद्याथ्र्यांची सोय होणार आहे.