Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण
By Ajay.patil | Published: April 27, 2023 02:01 PM2023-04-27T14:01:45+5:302023-04-27T14:21:20+5:30
Gulabrao Patil: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.
- अजय पाटील
जळगाव - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर प्रताप पाटील यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. समर्थकांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर प्रताप पाटलांचा भावी आमदार उल्लेख झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
प्रताप पाटलांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या या बॅनरची चर्चा जळगाव ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हे बॅनर लागले आहेत. जर प्रताप पाटील हे भावी आमदार असतील तर ते आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार की मग विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्याऐवजी प्रताप पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल का ? यासंदर्भात चर्चा रंगली आहे. प्रताप पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशी ही मध्यंतरी चर्चा होती. त्यानंतर आता ‘भावी आमदार’ म्हणून प्रताप पाटलांचे बॅनर लागल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल की ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये निवडणूक लढवणार, याची चर्चा रंगली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची आगामी काळात भूमिका काय राहील याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
सोशल मीडियावर चर्चा सुरु..
अनेकांनी पाळधी जवळील महामार्गालगत लावण्यात आलेल्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर अनेकांच्या व्हॉट्सॲप इन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टेटस लगत देखील प्रताप पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला जात आहे. जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर आतापर्यंत माजी आमदार ओंकार वाघ यांचे पुत्र दिलीप वाघ हे आमदार झाले. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनिष जैन हे विधानपरिषदेतून आमदार झाले. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे सध्या रावेर लोकसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे हाच कित्ता पालकमंत्र्यांनी गिरवला, तर विधानपरिषदेसाठी प्रताप पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रताप पाटील आधीच जिल्हा परिषद सदस्य होते, त्यामुळे ते आधीच राजकारणात असल्याने आगामी काळात मोठी संधी मिळण्याचीही शक्यता आहे.