प्रति त्र्यंबकेश्वर चौंडेश्वरला शिवभक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:40 PM2017-07-30T12:40:42+5:302017-07-30T12:42:54+5:30
श्रावणी सोमवार विशेष : वाघूर नदीच्या तिरावरील निसर्गरम्य देवस्थान
ऑनलाईन लोकमत / अर्पण लोढा
वाकोद, जि. जळगाव, दि. 30 - ता. जामनेर : मराठवाडा-खान्देश सीमेवर वाघूर नदीच्या तिरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले चौण्डेश्वर महादेव मंदिर प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून नावारुपाला आले आहे. नवसाला पावणारे अशी ख्याती असलेल्या या जागृत देवस्थानावर श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची गर्दी होत आहे.
जळगाव , औरंगाबाद , जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक श्रावण मास तसेच शिवरात्रीला येथे येतात व श्रद्धावत भोजन देवून नवस फेडतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.
प्रति त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर येथे होणारे विविध विधी या ठिकाणीदेखील होतात, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे. शास्त्रानुसार यासाठी नदी व नाल्याचा संगम, शिवाचे स्थान व बाजूला स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. हे सर्व त्र्यंबकेश्वर पाठोपाठ चौंडेश्वर येथेदेखील असल्याने येथे नारायण नागबली, त्रिपिंडी व इतर विधी येथे होऊ शकतात, असे पुरोहित गजानन जोशी यांनी सांगितले. इतकेच नव्हे अनेकांनी येथे हा विधी केला आहे.
वाकोद येथील माजी जि.प. सदस्य शिवाजीराव देशमुख यांचे वडील नामदेवराव देशमुख यांनी येथील मंदिराची उभारणी केली असून या परिवाराची अतूट श्रद्धा असल्याने मागील वर्षी देशमुख कुटुंबियांकडून या ठिकाणच्या महादेव पिंडी वर 150 किलो चे तांब्र लिंग अर्पणदेखील केले होते.
कै. रामदास बाबा चे मोठे योगदान
चौण्डेश्वर महादेव मंदिराचे निष्ठावान पुजारी म्हणून शेवटपयर्ंत रामदास बाबा यांनी येथे काम पाहिले होते. या परिसरातच त्यांनी महादेवाचे आणखी एक भव्य मंदिर तसेच हनुमान मंदिर, एक धर्मशाळा उभारली आहे. बाबांचे मोठे योगदान असून त्यांनी या ठिकाणी भक्ति व पूजा करून आपले संपूर्ण आयुष्य घालविले असल्याने त्यांच्या निधनानंतर या मंदिर परिसरात त्यांची समाधीदेखील बांधण्यात आली आहे.
सध्या श्रावण मास, विशेषत: सोमवारी येथे मोठी गर्दी होत आहे.