साहित्य संमेलनावर सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी, प्रतिमा परदेशी यांची सरकारवर टीका
By सुनील पाटील | Published: December 27, 2023 08:05 PM2023-12-27T20:05:08+5:302023-12-27T20:05:31+5:30
अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव : शेतमालाला भाव नाही, उत्पादन नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय, तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या न देता कंत्राटी पध्दतीने काम देऊन त्यांना राबवून घेतले जात आहे तर दुसरीकडे जनतेकडून कर स्वरुपात जमा होणाऱ्या पैशाची अखिल भारतीय साहित्य संमेलनावर कोट्यवधीची उधळपट्टी केली जात आहे. सरकारी साहित्य संमेलन अशी नवी ओळख त्यातून तयार होत आहे. सरकार यांच्याकडे पाणी भरत असल्याची टीका विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी यांनी केली आहे.
अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक श्याम पाटील यांची बुधवारी पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. त्यावेळी प्रा.परदेशी यांनी सरकार व अखिल भारतीय साहित्य संमेलनावर टिका केली. आम्ही देखील साहित्य संमेलन घेतो, पण सरकारकडून एक रुपया घेत नाही. मूठभर धान्य व एक रुपया इतकेच घेतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन व आमच्यात विचारांचे युध्द आहे. त्यांच्या मूल्य संस्कृतीच्या विरोधात मुद्दामच आम्ही देखील अमळनेरात साहित्य संमेलन घेत आहोत. सरकारकडून अनुदान घ्यायचे, त्यातून अलिशान भोजनावळी, साहित्यांना पाकिट द्यायचे हे कसले संमेलन. ज्यांनी उभं आयुष्य साहित्यात घालवले, त्या नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, तेव्हा यांनी साधा निषेधाचा ठराव केला नाही. यांच्या संमेलनाला शासनाने तीन कोटी ८० लाखाचे अनुदान देऊ केले आहे. जिल्हाधिकारी बैठका घेत आहेत. हे सरकारी साहित्य संमेलन आहे का?. संमेलनावर जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार आहे, त्यामुळे अनुदान तातडीने बंद करावे अशी मागणी त्यांनी केली.
मुकूंद सपकाळे कार्याध्यक्ष
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकूंद सपकाळे यांची तर मुख्य संयोजकपी अमळनेर येथील धनदाई कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संयोजकपदी मिलिंद बागुल, मुख्य समन्वयकपदी प्रा.अशोक पवार, करीम सालार यांची तर निमंत्रक म्हणून रणजित शिंदे यांच्या निवडीची घोषणा यावेळी करण्यात आली.