संघाच्या सेवालयात मुस्लीम तरुणांची नमाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:32 AM2019-11-11T05:32:39+5:302019-11-11T05:32:42+5:30
जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सेवालयात रविवारी ईद-ए- मिलादच्या निमित्ताने जणू ‘राम - रहिम’ गळाभेट घेत आहेत,
जळगाव : जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सेवालयात रविवारी ईद-ए- मिलादच्या निमित्ताने जणू ‘राम - रहिम’ गळाभेट घेत आहेत, अशा एकतेचे दर्शन घडले. रूग्णालयात सेवा देण्यासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी नमाजाची वेळ झाल्याने सेवालयात नमाज पठण केले.
अयोध्या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा निघाल्याने संपूर्ण देशात सौहार्दचे दर्शन घडले आहे. यंदाच्या ईदला यामुळे देशभर एकात्मतेची अनोखी झळाळीही होती. त्या पार्श्वभूमीवर काही मुस्लीम बांधवांनी जिल्हा रूग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यातील काहींना रा़ स्व़ संघाच्या जनकल्याण समितीच्या सेवालयाबद्दल माहिती होती़ दोन मुस्लीम बांधवांनी या सेवालयात देणगीही दिली.
नमाज पठनानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ विनायक वाणी, मंगला पाटील, पराग महाशब्दे यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.
>सेवालयामार्फत दैनंदिन अन्न वाटप केले जात असते. ईदनिमित्त या तरुणांनी आपल्या स्टॉलशेजारीच फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेळ झाल्याने त्यांनी नमाज पठणाबाबत विचारणा केली. आम्ही त्यास होकार दिला. आमच्यासाठी हा आनंद आणि गौरवदायी क्षण होता. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशीच सद्भभावना वाढीस लागावी.
- दीपक घाणेकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक