जळगावात रमजान ईद उत्साहात, विश्वशांतीसाठी मुस्लीम बांधवांनी केली प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:01 PM2019-06-05T12:01:42+5:302019-06-05T12:04:36+5:30
एकमेकांना दिल्या शुभेच्छा
जळगाव : जोरदार पाऊस पडू दे, सर्वत्र शांतता नांदो तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी रमजान ईदनिनित्त मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. बुधवारी शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे अजिंठा चौफुलीनजीकच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली. त्यात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सर्व मानव जातीला यशस्वी होऊ दे, शेती व पिण्यासाठी चांगला पाऊस पडू दे, विश्वामध्ये शांती लाभू दे अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. ईदनिमित्त विविध मान्यवरांनी ईदगाह मैदान येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
सुन्नी ईदगाह ट्रस्टतर्फे नियाज अली नगर येथील ईदगाह मैदानावरदेखील नमाज पठण करण्यात आली. ईदनिमित्त सकाळपासूनच समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह होता. नमाज पठणासाठी आलेल्या सर्व अबालवृद्धांनी नवीन वस्त्र परिधान करून नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या सोबतच नंतरही घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. समाजबांधवांतर्फे शिरखुम्यासाठी निमंत्रण देण्यात येऊन हिंदूबांधवांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.