पूर्वकर्म होळी सांडू.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 09:38 PM2020-03-08T21:38:21+5:302020-03-08T21:39:34+5:30

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात. दैंय दु:ख आम्हा न येती ...

Pre-Holi Holi Sandu ..... | पूर्वकर्म होळी सांडू.....

पूर्वकर्म होळी सांडू.....

googlenewsNext

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात.
दैंय दु:ख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष।।
तुकोबा सांगतात - ‘मी होळीत माझ्यातले दोष जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की, दारिद्र आणि दु:ख माझ्या जवळ सुद्धा येत नाही. दोष नाही तर दारिद्र नाही, आणि त्यामुळे दारिद्रांतून निर्माण होणारे दु:ख नाही.’
वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्म होळी सांडू ।।
अमुप हे गाठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ।।
तुकोबा या अभंगात सांगतात- आम्ही पांडुरंगाची चरणवंदना करून, त्यांचे उष्टे सेवन करू, त्यामुळे माझ्या पूर्व कर्माची होळी होईल.
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज सांगतात-
देह चतुट्याची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।१।।
अजुनि का उगलासी। बोंब पडो दे नामाची ।।२।।
मांदियाळी मिळवा संतांची । तुम्हा साची सोडविण्या ।।३।।
धावण्या धावती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसती ।।४।।
एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक जाले ।।५।।
स्थुल, सुक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारही देहांची होळी रचून, त्याला सदगुरू कृपेने प्रगट होणारा ज्ञानाग्नी लावून, ती होळी समुळ जाळून टाकली पाहिजे, आपण सदगुरूंनी दिलेल्या नामाची, त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मारावी व या संसार चक्रातून सोडवणूक होण्यासाठी, संताच्या मांदीयाळीला शरण जावे व यथार्थपणे सोडवणूक होईल.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुलाल किंवा अबीर शरीराच्या त्वचेला उत्तेजित करतं आणि आरोग्याला बळकट करतं, त्यात होळी हा सण अशा वेळेस येतो जेव्हा ऋतू बदलांमुळे लोकांमध्ये नैराश्य आणि उदासिनता जाणवते. उबदार हवामानामुळे शरीरात काही प्रमाणात थकवा आणि आळसपणा येतो. शरीराचा हाच थकवा आणि आळसपणा घालविण्यासाठी या हंगामात लोक फक्त गाणचं नव्हे तर बोलतानाही थोडे मोठ्यानेच बोलतात. त्यामुळे कळत-नकळत रोजच्या त्रासातून मनही हलके होते. या हंगामात ऐकू येणारे संगीत देखील जोरदारचं असतं. त्यामुळेच शरीरात नवीन उर्जा निर्माण होते. शुद्ध स्वरूपातील अबीर आणि गुलाल शरीरावर टाकल्याने याचा फार आरामदायी प्रभाव पडतो आणि यामुळे शरीर ताजेतवाणे होते. सगळ्यांसोबत गाणं गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी खुश होऊन जातं. होळी खेळण्यामागे या वैज्ञानिक बाबींचा विचार महत्वाचा आहे. महाराष्टÑात रंग पंचमीला अधिक महत्व आहे.
-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव.

Web Title: Pre-Holi Holi Sandu .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव