महावितरणकडून मान्सूनपूर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:50+5:302021-05-28T04:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : परिसरात मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली तासनतास वीज खंडित केली जात असताना, तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरात मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली तासनतास वीज खंडित केली जात असताना, तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या पलीकडे कोणतेच ठोस कार्य महावितरणकडून झालेले नाही. विशेषतः शेतीशिवारातील झुकलेले खांब अजूनही तसेच उभे असून, पावसाळ्यात त्यांची अवस्था आणखी वाईट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा होणाऱ्या गावठाण व शेतीपंपाच्या वीज वाहिनींना आधार देण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी तर काही ठिकाणी सिमेंटचे खांब वापरण्यात आले आहेत. पैकी लोखंडी खांब सुस्थितीत दिसत असले तरी सिमेंटचे खांब मात्र खूपच निष्काळजीपणे उभे करण्यात आले आहेत. जमिनीतील खड्ड्यात पुरेसे काँक्रीट वापरण्याची तसेच आवश्यक त्या ठिकाणी ताण देण्याची काळजी घेण्यात न आल्याने बहुतांश खांब एका बाजूला झुकले आहेत. थोडाही वारा आला तरी सदरचे खांब कोलमडून पडण्याची भीती निर्माण झाली असताना, शेतकरी व मुक्या प्राण्यांच्या जिवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात शेतांमध्ये पिके उभी राहत असल्याने झुकलेले खांब सरळ करण्याची संधी नसते. मात्र, उन्हाळ्यात शेती रिकामी असताना महावितरणकडून त्यासाठी कोणतीच हालचाल केली जात नाही. त्याबाबतीत शेतकऱ्यांकडून विनवणी करण्यात आल्यावर मजुरीचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल, अशी उडवाउडवीची उत्तरे जबाबदार व्यक्तींकडून मिळतात. खांब जमिनीकडे झुकल्यानंतर वीजवाहक तारा अगदी हाताच्या अंतरावर आल्याचे दिसत असल्या तरी शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
----------------
ममुराबाद- जळगाव रस्त्यालगतच्या एका शेतात विजेचे खांब झुकल्यानंतरही महावितरणने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. (जितेंद्र पाटील)