जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:27+5:302021-05-29T04:13:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बळीराजा तयार झाला असून, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड ...

Pre-season cotton cultivation on an area of 50,000 hectares in the district | जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवड

जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बळीराजा तयार झाला असून, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कापसावर दरवर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून हंगामपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. तसेच कापूस लागवडीसाठी आवश्यक बियाणेदेखील एक जूननंतरच शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. जळगाव, चोपडा, धरणगाव, यावल या तालुक्यांमध्ये सर्वाधिक लागवड झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून हंगामपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन केले जात असले तरी पूर्ण हंगामात तीन पिके घेता यावीत, यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व कापूस लागवडीवर भर दिला जातो.

१० जूनपर्यंत जिल्ह्यात होणार मान्सूनचे आगमन

जिल्ह्यात दरवर्षी सात जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता निर्माण होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होत असते. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले होते. त्यामुळे जून महिन्यातच जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी १० जूनपर्यंत जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात दोन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा अंदाज स्कायमेट या हवामान खात्याने वर्तवला, पावसाचे आगमन झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.

धूळ पेरणीचे क्षेत्र झाले कमी

कृषी विभागाकडून दरवर्षी धूळपेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जात असते. मान्सूनचे उशिरा होणारे आगमन यामुळे दुबार पेरणीचे निर्माण होणारे संकट, या कारणासाठी आता जिल्ह्यात धूळपेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आधी धरणगाव अमळनेर तालुक्यात धूळपेरणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, आता केवळ पंधरा ते वीस हेक्टर क्षेत्रावर धूळपेरणी होत असल्याचे समोर आले आहे. धरणगाव तालुक्यातील रेल, लाडली, दोनगाव या परिसरातच आता जेमतेम धूळपेरणी होत असते.

Web Title: Pre-season cotton cultivation on an area of 50,000 hectares in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.