खबरदारी म्हणून महापालिका, पालिका हद्दीतील सर्व शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:41 PM2020-03-16T12:41:41+5:302020-03-16T12:42:03+5:30

३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात दक्षता : शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले पत्र

As a precaution, all schools in the municipality and municipal limits are closed | खबरदारी म्हणून महापालिका, पालिका हद्दीतील सर्व शाळा बंद

खबरदारी म्हणून महापालिका, पालिका हद्दीतील सर्व शाळा बंद

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती हद्दितील इयत्ता पहिले ते बारावी पर्यंतच्या शासकीय, खासगी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांनी दिले आहेत़ याबाबत रविवारी त्यांनी पत्र काढले़
कोरोनाबाबत दक्षता म्हणून शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी हे पत्र काढले आहे़ दरम्यान, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी शाळेत जावे, असे कुठलेही आदेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे़ सोमवारी काही विद्यार्थी शाळेत आले जरी तरी त्यांना सूचना देऊन घरी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे़
दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू
दहावी, बारावीच्या परीक्षा ज्या वेळेत आहे त्या वेळेतच व त्या केंद्रांवरच होणार आहे़ आजारी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी शिक्षक व मुख्याध्यापकांनी घ्यावी असे, शिक्षणाधिकारी पाटील यांनी पत्रात म्हटले आहे़
व्हॉट्सअ‍ॅपवर सूचना
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, गृहपाठाबाबत व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप, ई-मेलच्या माध्यमातून पालकांच्या संपर्कात राहावे, असेही आदेशीत करण्यात आले आहे़ पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, असेही आदेश देण्यात आले आहे़ यानुसार अनेक खासगी शाळांनी पालकांच्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपवर सुट्ट्यांबाबत कळविले आहे़ महापालिकेच्या शिक्षण विभागानेही पत्र काढले आहे़
वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सुरक्षितते संदर्भात आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. या काळात परीक्षा नसेल असे विद्यार्थी वसतिगृह अधीक्षकांच्या परवानगीने आपल्या मूळ गावी जाऊ शकतात. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता प्राचार्य, संचालक व विभागप्रमुखांनी घ्यावी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयातील व्यायामशाळा(जिम), जलतरण तलाव या कालावधीत बंद ठेवावे असे परिपत्रकात विद्यापीठाने म्हटले आहे.

ग्रामीण भागातील शाळा सुरू राहणार
ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी मात्र सुरू राहणार आहे़ असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रांचाच उल्लेख असल्याने ग्रामीण भागाबाबत संभ्रम होता़ मात्र, ग्रामीण भागांतील शाळा सुरू राहणार असल्याचे प्रशसनाकडून सांगण्यात आले आहे़

विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयेही ३१ पर्यंत बंद
कोरोना विषाणूचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व शैक्षणिक प्रशाळा व संलग्न महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज सोमवार १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांनी रविवार परिपत्रक जारी केले आहे. विद्यार्थ्यांनी वर्गास उपस्थित राहू नये. तथापि इतर शैक्षणिक कामकाज सुरू राहणार असल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, अधिकारी,कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे.या कालावधीत विद्यापीठाच्या असलेल्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार सुरू राहतील. असे त्यांनी म्हटले आहे़

जळगाव युआसीटीबाबत पंतप्रधानांचे टिष्ट्वट
जळगाव युआयसीटी (युनीव्हर्सीटी इस्टीट्युट आॅफ केमीकल टेक्नॉलॉजी, रसायन तंत्रज्ञान संस्था)ही देशातील एक नामांकित संस्था असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी वीस दिवस ही संस्था बंद ठेवावी, जेणेकरून भावीअभियंत्याचे भविष्य धोक्यात येणार नाही, असे टिष्ट्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्यांनी याबाबत युआयसीटीचे संचालक डॉ़ जे़ बी़ नाईक यांना आवाहन केले आहे़ जळगाव युआयसीटीत सद्यस्थितीला ५५० भावी अभियंता शिक्षण घेत आहेत़

Web Title: As a precaution, all schools in the municipality and municipal limits are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.