मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:43+5:302021-03-23T04:17:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी बेड उपलब्ध व्हावे यासाठी लक्षणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी बेड उपलब्ध व्हावे यासाठी लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करावे व मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार अशा आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रुग्णालयांना दिल्या आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सिजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.
सद्य:स्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून, त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णांची वर्गवारी व सुचविलेल्या उपाययोजना
- लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सिजन व अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना बाह्यरुग्ण विभागातून (ओपीडी) योग्य समुपदेशन करून उपचार करावा व गरज भासल्यास वेळोवेळी तपासणी करावी.
- मध्यम स्वरूपाचा छातीचा सीटी स्कॅन मूल्यमापन असलेल्या व मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार असे आजार असलेल्या रुग्णांना जरी ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर इंजेक्शन रेमडीसिविर व इतर औषधोपचार वैद्यकीय गरजेनुसार व प्रोटोकॉलनुसार वेळीच करण्यात यावेत.
- या प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेडची उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांनी रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर आवश्यक उपचार करावेत.
- रुग्णांस औषधोपचार करून काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रुग्णवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.
- बेड उपलब्ध होत नसेल तरच असे उपाय केल्यास मध्यम इतर आजाराच्या रुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल.
- अशा रुग्णांना पुढील काळात बेड उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेड उपलब्ध आहेत त्याठिकाणी संदर्भित करण्यात यावेत.