गरोदर महिलेची उपचारासाठी फरफट, वाटेतच प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:34 PM2020-05-09T12:34:03+5:302020-05-09T12:34:16+5:30
धक्कादायक : कोरोनाच्या संकटात बाळ गमावले, प्रशासकीय फिरवाफिरव बेतली बाळाच्या जीवावर
जळगाव : कोरोनाच्या संकटात अन्य व्याधी, उपचार मिळविणे अतिशय जिकरीचे झाले असून याची अनेक उदाहरणे वारंवार समोर येत आहे़ त्यातच प्रशासकीय कागदांसाठी गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कदायक प्रकार जळगावात घडला. भोकर- भादली (ता. जळगाव) येथील मजूर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार भादली येथील पूनम प्रकाश बारेला या महिलेला प्रसुतीपूर्व त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी कोविड रुग्णालयात आणले मात्र, सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर मालकासह कुटुंबीय या महिलेला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले़ मात्र, त्या ठिकाणी गेटवरच सुरक्षा रक्षकांनी शिफारस पत्राची मागणी करीत, कोविड रुग्णालयातून शिफारस पत्र आणण्यास सांगितले़ कुटुंबीय पुन्हा या महिलेला घेऊन जळगावात आले, मात्र, दूरदर्शन टॉवरजवळ महिलेला अधिक त्रास होऊ लागला वाहन थांबविले असता याच ठिकाणी या महिलेची प्रसुती झाली़ मुलगी झाली मात्र, त्या बाळाचा मृत्यू झालेला होता़
दोन दिवसात दोन घटना
जळगावात कालच डॉक्टर व एका सामाजिक कार्यकत्याने पुढाकार घेत एका महिलेची रस्त्यावर वाहनात सुखरूप प्रसुती केली होती़ मात्र, हे भाग्य पुनमच्या नशीबी नव्हते, प्रशासकीय यंत्रणेच्या घोळात वेळवर उपचार न मिळाल्याने कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने बाळाचा जीव गेल्याचा धक्कदायक प्रकार जळगावात घडला़