जळगावातील गरोदर माहेरवासीन संशयास्पदरित्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:05 PM2018-04-03T18:05:22+5:302018-04-03T18:05:22+5:30
सासरच्या मंडळींवर व्यक्त केला नातेवाईकांनी संशय
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३ : सुप्रीम कॉलनी येथील माहेर असलेली सुमैय्या हारुण खाटीक (वय २४) ही आठ महिन्याची गरोदर विवाहिता तिच्या अडीच वर्षाच्या मुलीसह बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे येथून २६ मार्चपासून गायब झालेली आहे. या प्रकरणात सासरच्या मंडळींवरच संशय असून त्यानी तिचे बरेवाईट केले असावे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल व तांत्रिक माहितीच्या आधारावर चौकशी करण्यात यावी यासाठी नातेवाईक अक्रम अब्बास खाटीक व अन्य नातेवाईकांनी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांची भेट घेतली. याबाबतची एक तक्रार नातेवाईकांनी धुळे पोलीस अधीक्षकांकडे देखील केली आहे. संशय येऊ नये यासाठी पतीने पत्नी हरविल्याची तक्रार नरडाणा पोलिसात केली आहे. या तक्रारीनंतर पतीची वागणूक संशयास्पद असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.
आई, वडीलांना दिली धोक्याची माहिती
सुमैय्या हिचे हारुण खाटीक याच्याशी लग्न चार वर्षापूर्वी सुप्रीम कॉलनीत झाले होते. लग्नात मानपान नाही, हुंडा कमी दिला.त्यातच तू मुलीला जन्म दिला या सारख्या अनेक कारणांनी सुमैय्या हिचा सासरच्याकडून छळ होत होता. या दरम्यान त्यांच्याकडून बरेवाईट करण्याची धमकीही दिली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता सुमैय्या हिने २६ मार्च रोजी जळगावला आई, वडीलांना फोन करुन धोक्याची माहिती दिली. घाबरलेल्या पालकांनी लागलीच त्याच दिवशी बेटावद गाठले असता मुलगी घरी नव्हती. ती कुठे तरी निघून गेली असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून मुलगी घरी नसल्याने तिचे बरेवाईट झाले असावे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पतीने नरडाणा पोलिसात पत्नी हरविल्याची नोंद केली. त्यानंतर तिचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही असे अक्रम खाटीक यांनी म्हटले आहे.