बीएचआर घोटाळ्यात प्रेम कोगटा, छगन झाल्टे यांच्यासह १२ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:11+5:302021-06-18T04:12:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद, मुंबई, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र राबविले. जळगाव शहरातून सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत गणपत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम रामनारायण कोगटा, जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला (सर्व रा. जळगाव), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापरी राजेश लोढा (सर्व रा. जामनेर), भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली यांचा मुलगा आसीफ मुन्ना तेली, प्रीतेश चंपालाल जैन (रा. धुळे), अंबादास आबाजी मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई, मूळ रा. जळगाव) व प्रमोद किसनराव कापसे (रा. अकोला) या १२ जणांना अटक केली आहे.
भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करतानाच सहा वाजता ताब्यात घेतले, तर प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. जितेंद्र पाटील यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. भागवत भंगाळे यांना जिल्हापेठ, तर संजय भगवानदास तोतला यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे अटकेची नोंद घेण्यात आली. त्यानंतर भंगाळे यांना पुन्हा त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे घरझडती व पंचनामा करण्यात आला.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांचे पथक जळगावात दाखल झाले. जळगाव जिल्ह्यात १०, तर इतर ठिकाणी बाहेर ५ अशी १५ पथके एकाच वेळी पुण्यातून बाहेर पडली.
काय आहे प्रकरण?
पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्याच प्रकरणात आता पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची १० पथके दुसऱ्यांदा जळगावात आली. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया करून ही पथके सायंकाळी पुण्याकडे रवाना झाली.
ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये नियमबाह्य समायोजित केली कर्ज
अटक केलेल्या सर्व जणांनी बीएचआर पतसंस्थेतून मोठमोठी कर्ज घेतली आहेत. कर्जाची परतफेड करताना ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये नियमबाह्य कर्जाची रक्कम समायोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, कर्जाचा आकडा लाख व कोटीच्या घरात आहे. याचे संपूर्ण पुरावे व फाइल्स हाती लागल्यानंतरच पुणे पोलिसांनी वाॅरंट काढून अटकेची मोहीम राबविली.
कोट....
जळगाव जिल्ह्यासाठी दहा पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. त्याशिवाय इतर जिल्ह्यातही कारवाई सुरू आहे. एकूण १५ पथके यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहेत. अटक केलेले सर्व संशयित बलाढ्य कर्जदार आहेत. त्यांनी ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्यात स्वत:चे कर्ज नियमाबाह्य समायोजित केली आहेत. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत.
- भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे