अवकाळीने हिरावला शेतकऱ्यांचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:32+5:302021-02-20T04:45:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, शिरसोली, दापोरा, गाढोदा परिसरातील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे गहू, दादर, मक्याचे पीक आडवे पडले आहे, तर वादळामुळे केळीच्या कांदेबागेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रबीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा घास पावसामुळे हिरावला गेला आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे यंदा रबीच्या हंगामात त्याची भरपाई भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल ३५ ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली. यामुळे आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर आव्हाणे शिवारात गव्हाचे व हरभऱ्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
केळीचे नुकसान, गहूही झाला आडवा
कठोरा, भादली, भोकर या भागात जोरदार वादळासह झालेल्या पावसात केळीच्या कांदेबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीचे घड उन्मळून पडले आहेत. दापोरा परिसरातदेखील केळीचे नुकसान झाले आहे. वडली, शिरसोली परिसरातदेखील रबीच्या गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. गाढोदा, पळसोद भागातही रबीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा तापी व गिरणा नदीच्या मध्ये येणाऱ्या आमोदा, सावखेडा, कठोरा या भागात बसला आहे.
अजून दोन दिवस अवकाळीचे सावट
जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ तारखेपर्यंत सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात गहू, हरभरा व मका काढण्याचा स्थिती आले आहेत. अशावेळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
रात्रीच्या वेळेस सुमारे एक ते दोन तास झालेल्या वादळात महावितरणचेही पितळ उघडे पडले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील निम्म्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शिरसोली, आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता, तर कानळदा, नांदगाव भागातदेखील रात्रभर विजेचा लपंडाव सुरूच होता.